वहाळ आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब, लसीकरणात कर्मचाऱ्यांचा बोगस कारभार उघड

लसीकरणाचे संदेश पर्यवेक्षक उशिराने पाठवत असल्याने अनेकांना लसीकरणापासून वंचित रहावे लागते. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील दांडीबहाद्दर डॉक्टर यांच्याविषयी तक्रारी ऐकल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी संबधितांना कडक शब्दात सुनावत ही वेळ संकटाशी सामना करण्याची वेळ आहे. कामचुकारपणा करू नका. बेजबाबदारपणे तुम्ही वागता त्याचे तुम्हाला काही वाटते का? असा प्रश्न उपस्थित केला. आरोग्य केंद्रातील डॉक्टरच गैरहजर असल्याचे स्वत आमदार भास्कर जाधव यांनी अनुभवल्यानंतर आपण याची नोंद घेऊ असे सांगितले.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार भास्कर जाधव यांनी भेट दिली. आज ते वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तिथल्या समस्या जाणून घेण्यासाठी गेले होते. या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणाची माहिती घेत असताना लस उपलब्ध झाल्याचे मेसेज रूग्णालयाचा सुपरवायजर त्यांच्या गावागावातील आरोग्य कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक  उशिरा पाठवतो. त्यामुळे पुढे हे मेसेज लोकांपर्यंत वेळेत पोहोचत नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांच्या अवतीभवती असलेले लोकंच लसीकरण करतात, 
 
अशा तक्रारी स्थानिक लोकांकडून समोर आल्या. परंतु, ही वेळ वादावादीची नाही, डॉक्टरांना मदत करण्याची आहे, असे सांगून डॉक्टरांचे मनोधैर्य वाढविण्याची, त्यांना मदत होईल अशी भूमिका घेवून ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न आ. जाधव करीत होते. परंतु, ग्रामस्थांकडून वारंवार हा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांनाही थोडी शंका आली. त्यांनी सुपरवायजरला विचारले असता मेसेज वेळेत पाठविल्याचे त्याने सांगितले. परंतु, ज्यावेळी त्याच्या मोबाईलवरून पाठवला गेलेला मेसेज पाहिला तेव्हा त्याने केलेली लबाडी समोर आली. त्याने मेसेज सायंकाळी केला होता आणि सकाळी केल्याचे तो सांगत होता, हे पाहून आ. जाधव संतापले आणि त्यांनी सुपरवायजरसह डॉक्टरांनाही चार शब्द सुनावले. संकटाचा काळ असताना असं बेजबाबदार वागताना तुम्हाला काहीच वाटत नाही? असा सवाल त्यांनी केला. 
 
या आरोग्य केंद्रासाठी एमबीबीएस डॉक्टर म्हणून फुरूस आरोग्य केंद्राचे डॉ. विजय पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार आहे. पण ते कधीही येथे नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. यावर डॉ. पाटील आठवडयातून किती दिवस येतात, असा प्रश्न आ. श्री. जाधव यांनी उपस्थित डॉ. दीपाली पांडे व डॉ. मंदार आमले या बीएएमएस डॉक्टरांना विचारला. मात्र, त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः मोबाईलद्वारे त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद होता. डॉ. पाटील हे सरकारी रूग्णालयात कमी आणि स्वतः चालवित असलेल्या खासगी दवाखान्यातच जास्त असतात, अशीही तक्रार काही ग्रामस्थांनी केली. यावर आपण याची नोंद घेत आहोत, असे सूचक उद्गार आ. जाधव यांनी काढले.यावेळी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. या सर्वांनी आ.भास्कर जाधव यांचे आभार मानले. यावेळी माजी उपसभापती शरद शिगवण, रवींद्र सुर्वे, रमेश रेपाळ, निवळीचे उपसरपंच गणेश विचारे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या