वैभव डोंगरे

144

संगणकीय प्रणालीतून काढलेले बिल जेव्हा ग्रामीण भागातील माणसाच्या हाती पडते तेव्हा त्यातील इंग्रजी शब्दांचे अर्थ त्याला कळत नाहीत. अशावेळी आपण नक्की कोणती वस्तू किती रुपयांना खरेदी केलीय याचा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. ही अडचण दूर करण्यासाठी रत्नागिरीतील सॉफ्ट लॉजिकच्या वैभव डोंगरे यांनी संगणकीय प्रणालीतून बाहेर पडणाऱया बिलाची प्रत मराठीतून देणारी संगणकीय प्रणाली तयार केली आहे. डॉक्टरांकडे गेलेल्या रुग्णांचाही औषधांच्या चिठ्ठीवरचं इंग्रजी पाहून हाच गोंधळ उडतो. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीवरच औषधाची मात्रा किती आहे याची माहिती देणारी ‘क्लिनिक कोअर’ ही प्रणाली वैभव यांनी तयार केली असून काही डॉक्टर त्याचा वापर करू लागले आहेत. वैभव यांनी २००३ पासून सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २००५ मध्ये त्यांनी सॉफ्ट लॉजिक नावाची आपली स्वतःची संस्था स्थापन करून रत्नागिरीकरांना संगणकीय क्षेत्रात मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. रत्नागिरी जिह्याच्या शासकीय कामकाजामध्ये त्यांनी एक महत्त्वाची संगणकीय कार्यप्रणाली त्यांनी तयार केली. रत्नागिरी जिह्यातील सर्व सेतू कार्यालयांमध्ये वैभव यांनी केलेली मराठीतील संगणक प्रणाली वापरली जाते. २००५ मध्ये मराठीतून एखादी संगणकीय कार्यप्रणाली तयार करताना अनेक अडचणी येत असल्याचे वैभव सांगतात. ते म्हणतात की, त्यावेळी युनिकोडचा एवढा वापर नसल्यामुळे फॉण्टस्ची समस्या निर्माण व्हायची. २००५ साली अशी कार्यप्रणाली तयार करणं आमच्यासाठी ते एक आव्हान होते, कारण या कार्यप्रणालीची दैनंदिन व्यवहारात अंमलबजावणी होणार होती. तेव्हा ई-गव्हर्नेसची नुकतीच सुरुवात झाली होती. अशावेळी अनेक अडचणींवर मात करत ही कार्यप्रणाली तयार केली. त्या कार्यप्रणालीवरूनच आज नागरिकांना अनेक दाखले उपलब्ध होत असल्याचेही डोंगरे यांनी सांगितले. वैभव डोंगरे यांनी पाली येथील लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान, पॉवर हाऊस येथील गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, आदर्श प्रतिष्ठान सावंतवाडी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, जैन मंदिर चिपळूण या संस्थांच्या वेबसाईट मराठीतून तयार केल्या. रत्नागिरीतील मिलिंद पावसकर यांचा ब्लॉगही त्यांनी तयार केला आहे. जिल्हा पुरवठा विभागामध्ये अकाऊंटिंगसाठी एक मराठीतून संगणकीय प्रणाली तयार करून दिल्यामुळे तेथील कामही आता सुलभ झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या