‘वैजनाथ’ साखर कारखाना दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; ६ जण चिंताजनक

139

सामना ऑनलाईन । बीड

परळी तालुक्यातील पांगरी साखर कारखान्यात शुक्रवारी दुपारी उसाच्या रसाची टाकी फुटल्याने १२ कर्मचारी गंभीर भाजले होते. यापैकी २ कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ६ जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. मधुकर पंढरीनाथ आदनाक (५०) आणि सुभाष गोपीनाथ कराड (४५) अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जखमी कर्मचाऱ्यांवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाफेचा दाब वाढल्याने इव्हॅपोरेटरच्या खालच्या बाजूचा जोड दुभंगून आतील १२० डिग्री सेल्सिअस पेक्षाही अधिक तप्त उकळता रस आणि वाफेचे मिश्रण वेगाने बाहेर फेकले गेले. हा गरम रस अंगावर पडून १२ जण जखमी झाले होते. लातूर येथील लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी परळी तालुक्यातील असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे जखमींची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या