वैजापूर तालुक्याचे सुपुत्र शहीद किरण थोरात यांना मरणोत्तर सेवा मेडल

1071

समीर लोंढे । वैजापूर

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात वीरगती प्राप्त झालेले वैजापूर तालुक्याचे सुपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांना मरणोत्तर व उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्ली कॅन्टॉनमेंट येथे 72 व्या लष्कर दिनाच्या कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते वीरपत्नी आरती किरण थोरात यांना सेना मेडल बहाल करण्यात आले आहे.

दिल्ली कॅन्टॉनमेंट येथे 72 व्या लष्कर दिनाच्या कार्यक्रमानिमित्त 15 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील शहीद किरण पोपट थोरात यांना मरणोत्तर व उत्कृष्ट कामगिरीबद्दल सेना मेडल वीरपत्नी आरती किरण थोरात यांना लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी वीरपिता पोपटराव थोरात यांचीदेखील उपस्थिती होती.

वीरपिता पोपटराव थोरात यांच्याशी दैनिक ‘सामना’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 15 जानेवारी रोजी दिल्ली येथे लष्कराच्या कार्यक्रमास आम्ही उपस्थित असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी माझी व वीरपत्नी आरती किरण थोरात यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर दिला.
वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील जवान किरण पोपटराव थोरात हे कश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना पाकड्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. किरण थोरात यांनी आपल्या सैनिकी सेवेच्या पहिल्या वर्षी 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर लष्कराच्या सैनिकांचे पथसंचलनालयाचे नेतृत्व करून तिरंगा झेंडा हातात घेतला होता. त्यानंतर फ्रान्स येथे लष्कराच्या सैनिकांच्या पथसंचलनाचे नेतृत्व करून आपले नाव संपूर्ण जगासमोर आणले होते. सैन्यात कर्तव्य बजावत असताना थोड्या काळातच स्वत:चे व वैजापूर तालुक्याचे नाव रोषण केले होते.

कश्मीर भागातील पूंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकड्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांना 11 एप्रिल 2018 ला वीरमरण आले. शहीद किरण थोरात यांच्या कार्याची दखल घेऊन लष्कराच्या वतीने मरणोत्तर व उत्कृष्ट कामगिरीबद्दल सेना मेडल वीरपत्नी आरती थोरात व वीरपिता पोपटराव थोरात यांना देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या