मिरची बाबाचा हाय व्होल्टेज ड्रामा, जलसमाधीसाठी दिली पुढील तारीख

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह पराभूत झाल्यामुळे अडचणीत आलेल्या महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद उर्फ मिरची बाबाची नौटंकी काही संपत नाही. मिरची बाबाची भोपाळमधील बडा तलावामध्ये जलसमाधी घेण्याची घोषणा अखेर फूसकी ठरली. रविवारी दुपारी 2 वाजून 11 मिनीटांनी जलसमानी घेणार असल्याचे मिरची बाबाने जाहीर केले होते. मात्र जलसमाधीचा हाय व्होल्टेज ड्रामा करून मिरची बाबाने आता 20 जूनला जलसमाधी घेणार असल्याची  पुढील तारीख जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी मिरची बाबाने भोपाळमध्ये 5 क्विंटल मिरच्यांचा यज्ञ केला होता. तसेच उत्साहाच्या भरात त्यांनी ‘दिग्विजय सिंह हरले तर आपण जलसमाधी घेणार’ अशी घोषणाही केली होती. मात्र साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून दिग्विजय पराभूत झाल्यापासून बाबा गायब झाले होते. मात्र 3 दिवसांपूर्वी मिरची बाबाच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र गेले आणि त्यात आपण रविवारी 16 जून रोजी येथील बडा तलावामध्ये दुपारी 2 वाजून 11 मिनीटांनी जलसमानी घेणार असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. मिरची बाबाच्या जलसमाधीच्या घोषणेमुळे रविवारी बडा तलाव परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच संपु्र्ण तलाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. रविवारी दुपारी मिरचीबाबा भोपाळमध्ये अवतरले मात्र पोलीस त्यांना घेऊन थेट एका हॉटेलमध्ये गेले. बाबांची जलसमाधी घेण्याची वेळ निघून गेल्यानंतर 2 वाजून 40 मिनीटांनी मिरची बाबा प्रसारमाध्यमांसमोर आले. आपल्या जलसमाधीला पोलिसांनी खोडा घातल्याचे सांगून त्यांनी जलसमाधीसाठी 20 जानेवारी ही  पुढील तारीख दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या