Vaishno Devi Stampede – कोणत्यातरी व्हीआयपीसाठी CRPF जवानांनी लोकांना घाबरवलं होतं!

जम्मू-कश्मीरमधील कटरा येथील वैष्णो देवी इथे दर्शनासाठी आलेल्या 12 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे प्रचंड गर्दी झाली होती.

शनिवारी पहाटे अडीजच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली ज्यात या दुर्दैवी भाविकांचा मृत्यू झाला.

मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 8 जणांची ओळख पटवण्यात यश आलं असून ते हरयाणास उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-कश्मीरचे रहिवासी असल्याचं कळालं आहे.

चेंगराचेंगरी नेमकी का झाली, याचं कारण शोधून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.चेंगराचेंगरीची घटना जवळून पाहणाऱ्या हिमांशू अग्रवाल याने भास्कर या वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं की तो त्याचे मित्र हिमांशू शर्मा, जतीन आणि भारत यांच्यासोबत वैष्णो देवी येथे दर्शनासाठी आला होता.

दर्शन झाल्यानंतर परतत असताना पहाटे अडीज ते 3 वाजेच्या दरम्यान दर्शन करायला जाणाऱ्यांची आणि दर्शन करून परतणाऱ्यांची चेक पोस्ट 3 जवळ एकत्र गर्दी झाली. यामुळे ना येणाऱ्यांसाठी वाट उरली, ना जाणाऱ्यांसाठी. हिमांशूने म्हटलंय की हे सगळं घडत असताना सीआरपीएफचे जवान गर्दी कमी कशी करता येईल याकडे लक्ष देण्याऐवजी लोकांना धमकावून घाबरवण्यात मश्गुल होते.

कुठला तरी व्हीआयपी येणार असून, त्याच्यासाठी रस्ता रिकामा करा असं म्हणत ते लोकांना धमकावत होते. यामुळे घाबरलेली लोकं पुढे-मागे करायला लागली आणि तेव्हाच लोकं पडायला सुरुवात झाली.

धक्काबुक्कीमुळे पडत असलेल्या माणसाला सावरण्याच्या नादात दुसरा माणूस पडला आणि त्याचवेळी लोकं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. जवळपास 15 मिनिटं चेंगराचेंगरी सुरू होती.

सीआरपीएफचे अतिरिक्त जवान आल्यानंतर त्यांनी गर्दी पांगवण्यास सुरुवात केली असं हिमांशूने म्हटलं आहे. आम्ही खांबावर चढल्याने आमचा जीव वाचला असं त्याने म्हटलं आहे.