पत्रकार महिलेचा विनयभंग करणाऱ्या मिंधे गटाच्या वामन म्हात्रेला शुक्रवारी उच्च न्यायालयाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला. मात्र मीडियाशी काहीही न बोलण्याचा आदेश देऊन जोरदार चपराक लगावली. साक्षीदारांवर प्रभाव न टाकण्याचेही बजावले. म्हात्रेची अटक सोमवारपर्यंत टळली आहे.
कल्याण सत्र न्यायालयाने गुरुवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच अटक होण्याच्या भीतीपोटी म्हात्रेने शुक्रवारी सकाळीच उच्च न्यायालयात धाव घेतली व तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी दुपारी अडीच वाजता सुनावणी ठेवली. यावेळी म्हात्रेतर्फे अॅड. विरेश पुरवंत व अॅड. ऋषिकेश काळे यांनी बाजू मांडली. मी नगराध्यक्ष होतो. बदलापूर, कुळगाव, अंबरनाथची चिंता असल्याने पत्रकारांशी बोललो. मात्र काही आक्षेपार्ह विधान केले नाही, असा युक्तिवाद म्हात्रेतर्फे करण्यात आला. त्यावर सरकारी वकिलांनी आरोपी म्हात्रे हा पत्रकार महिलेला ओळखत होता. जात माहीत असल्यानेच त्याने अर्वाच्च भाषा वापरली, असे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने तक्रारदार महिलेचे म्हणणे ऐकण्यासाठी तिला नोटीस बजावली. त्यासाठी सोमवारी सुनावणी निश्चित करेपर्यंत म्हात्रेला अटकेपासून संरक्षण दिले.
नेमके प्रकरण काय?
शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपीवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही. याचा निषेध करण्यासाठी २० ऑगस्टला नागरिकांनी आंदोलन केले. त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलेला वामन म्हात्रेने ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ असे अर्वाच्च शब्द वापरले. याप्रकरणी म्हात्रेविरुद्ध विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.