वंदे भारत अभियान; मुंबईत आतापर्यंत परतले 2,423 हिंदुस्थानी

933

वंदे भारत अभियानाअंतर्गत परदेशात अडकून पडलेले 2,423 हिंदुस्थानी आतापर्यंत मुंबईत परतले आहेत. त्यापैकी 906 प्रवासी हे मुंबईकर असून उर्वरित महाराष्ट्रातील 1,139 आणि इतर राज्यातील 378 प्रवासी आहेत. यातील 1,128 जणांना 43 हॉटेल्समध्ये कोरेन्टाईन करण्यात आले आहे. 7 जूनपर्यंत आणखी 13 विमानांतून हिंदुस्थानी नागरिक परतणार आहेत.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना वंदे भारत अभियानअंतर्गत हिंदुस्थानात परत आणले जात आहे. मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृहमंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र सरकारने कार्यवाही केेली आहे. त्यानुसार, मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि मुंबई विमानतळ या सर्व यंत्रणा समन्वयाने कामकाज करत आहेत. यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांच्या मार्गदर्शनाने अपर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी उद्धव घुगे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी पद्माकर रोकडे, उमेश बिरारी यांच्यासह प्रत्येक पथकामध्ये 15 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

50 कर्मचारी-अधिकाऱ्यांचे विशेष पथक

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, संचालक (भूसंपादन) अनिल वानखडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैयासाहेब बेहरे यांच्यासमवेत सुमारे 50 अधिकारी-कर्मचारी यांचे पथक दररोज या संदर्भातील अंमलबजावणीवर देखरेख ठेवत आहेत.

१) केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन विशेष विमानांनी परत येणाऱया नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण (quarantine) केले जात आहे.

२) प्रामुख्याने इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

३) इतर जिल्हे व राज्यातील नागरिकांना त्यांचे संबंधित जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत कोरेन्टाईन केले जाणार आहे.

४) इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईत अलगीकरण व्यवस्थेमध्ये पाठवले जाते. वाहतूक परवाना संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येते.

५) मुंबईकर प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन)ची सुविधा म्हणून महानगरपालिकेने 88हॉटेलमध्ये मिळून 3,343 कक्ष आरक्षित केले आहेत.

आतापर्यंत परतलेले प्रवासी

10 मे रोजी लंडन येथून 326, सिंगापूरहून 243 आणि मनिला येथून 150 नागरिक परतले. 11 मे रोजी सॅनफ्रान्सिको येथून 107 आणि ढाका येथून 107 जण आले. 12 मे रोजी न्यू यॉर्क येथून 208 तर क्वालालम्पूर येथून 201 नागरिक परतले. 13 मे रोजी शिकागो येथून 195, लंडन येथून 327 तर कुवेत मधून २ जण आले. 17 मे रोजी अदिस अबाबाहून 78 तसेच काबूल येथून 12 जणांचे आगमन झाले. 18 मे रोजी मस्कत येथून 16 जण, 19 मे रोजी मनिला येथून 41 जण मुंबईत आले. 20 मे रोजी मनिला येथून 29 प्रवासी, 21 मे रोजी जकार्ता येथून 185 प्रवासी तर 22 मे रोजी जोहान्सबर्गमधून 196 जण मुंबईत परतले. 7 जूनपर्यंत जकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी विदेशातील ठिकाणांहून मुंबईत नागरिक परतणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या