भीमा-कोरेगाव प्रकरण -वरवरा राव यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

2018 मधील भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी 83 वर्षीय तेलुगू कवी डॉ. पी. वरवरा राव यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव नियमित जामीन मंजूर केला. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मागील काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे विचारात घेऊन न्यायमूर्ती यू. यू. लळीत आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने त्यांना सशर्त जामीन दिला.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राव यांना 28 ऑगस्ट 2018 रोजी हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. ते पार्किन्सन रोगाने त्रस्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय कारणास्तव नियमित जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती. त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी न्यायालयात बाजू मांडली. राव यांची प्रकृती ठीक नसून अलीकडच्या काळात प्रकृतीत काहीच सुधारणा झालेली नाही. तसेच त्यांच्याविरुद्ध कोणताही आरोप निश्चित करण्यात आलेला नाही आणि त्यांना कुठली कागदपत्रेही देण्यात आलेली नाहीत, याकडे अॅड. ग्रोव्हर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी आक्षेप घेतला. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एनआयए) जामिनाला कडाडून विरोध केला. मात्र राव यांच्या खालावलेल्या प्रकृतीचा विचार करीत न्यायमूर्ती लळीत यांच्या खंडपीठाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला. वरवरा राव यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत.