वैद्यकीय तपासणी करण्याचे तुरुंग प्रशासनाला आदेश द्या! वरवरा राव यांची हायकोर्टात याचिका

139

भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले 81 वर्षीय लेखक वरवरा राव यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राव यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आपण आजारी असून तुरुंगातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता संवेदनशीलता दाखवा तसेच आपली वैद्यकीय तपासणी करण्याचे तुरुंग प्रशासनाला आदेश द्या अशी मागणी राव यांनी केली आहे.

2018 साली वरवरा राव यांना अटक करण्यात आली असून ते तळोजा येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 26 जून रोजी वरवरा यांनी सत्र न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता मात्र सत्र न्यायालयाने सह आरोपी प्रोफेसर शोमा सेन यांच्या जामीन अर्जासह हा अर्ज फेटाळला. तळोजा मध्यवर्ती कारागृहात वरवरा यांची प्रकृती खालावल्याने राव यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज केला. जे जे रुग्णालयाने सुचवूनही तुरुंग प्रशासनाने आपली वैद्यकीय तपासणी केली नाही असा दावा वरवरा यांच्या वकिलांनी आज हायकोर्टात केला. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी तसेच तात्काळ वैद्यकीय तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी वरवरा राव यांच्या वतीने आज करण्यात आली.

नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांना दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयाने नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) चौकशीसाठी नवलखा यांना जामीन देऊ नये अशी मागणी न्यायाधीशांकडे केली तेव्हा कोर्टाने नवलखा यांना 10 दिवसांची कोठडी मंजूर केली.

आपली प्रतिक्रिया द्या