वर्ध्यात नदिच्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू

464

वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव-आष्टा व गोजी शिवारातील नदिला आलेल्या पुरात दोन महिला, एक बारा वर्षीय मुलगा व त्याचे आजोबा वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यातील एक घटना सोनेगाव (आष्टा) येथे तर दुसरी घटना गोजी येथे शनिवारी घडली. चारही मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.

चंद्रकला लोटे रा. सोनेगाव (स्टेशन) आणि बेबी भोयर रा. तळेगाव (टालाटुले) असे वाहून गेलेल्या दोन महिलांची नावे आहेत. नारायण पोहणे आणि त्यांचा नातू मंगेश रामचंद्र हिवरे अशी गोजी येथे वाहून गेलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चारही मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

सध्या शेतात डवरणाचे काम सुरू आहे. याच कामासाठी मजूर म्हणून गेलेल्या या महिला शेतकऱ्याच्या बैलगाडीने परत येत होते. त्यावेळी पुराच्या पाण्यात त्यांची बैलगाडी अडकली व त्याच गोंधळात या दोन्ही महिला वाहून गेल्या. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांच्याकडून मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला. यात दोन्ही महिलांचे मृतदेह मिळून आले.

आजोबा नातू गेले वाहून
धोत्रा (कासार) येथील आजोबा आणि नातू हे दोघे बैलगाडीने सावली सास्ताबाद येथे जात होते. दरम्यान गोजी लगत असलेल्या एका नदिला पूर आला होता. या पुरचा अंदाज आला नसताना या दोघांनी बैलगाडी त्यात टाकली. यात त्यांची बैलगाडी वाहून गेली. यात त्यांचा मृत्यू झाला. या दोघांचेही मृतदेह गोजी येथील नाल्यात आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या