मुख्यमंत्र्यांचा विरारमध्ये हल्लाबोल

61

सामना प्रतिनिधी। वसई

वसई-विरारमध्ये दादागिरीच्या जोरावर अनेक घोटाळे झाले आहेत. येथील बांधकाम व्यावसायिकांकडून घेतला जाणारा फंड हा झोलझाल फंडच असून तो वसूल करणाऱयांना थेट तुरुंगात पाठवू, असा जबरदस्त हल्लाबोल सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. येथील सर्व घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी विरारच्या मनवेल पाडा येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. तसेच वसई-विरार भागातील गुंडगिरीवर प्रहार करताना ते म्हणाले, येथील नळजोडणीतही भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. निवडणुकीची आचारसंहिता संपताच नळजोडणी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वसईतील दादागिरीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जे कधी वसई-विरारच्या बाहेर जात नाहीत ते दिल्लीत जाण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र विकासकामांच्या जोरावर राजेंद्र गावीत मोठय़ा मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. आगरी सेनेचे पालघर अध्यक्ष जनार्दन पाटील, माजी आमदार विवेक पंडित यांचीही यावेळी भाषणे झाली.

कल्याणचे डम्पिंग हटवणार

ठाणे, कल्याण, भिवंडीचा पायाभूत विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराची जाहीर सभा रविवारी फडके मैदानावर झाली. त्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या भागात मेट्रोचे जाळे तयार होत आहे. लोकलचा प्रवास अधिक सुखकर करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच कल्याणचे डम्पिंग ग्राऊंड हटवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री रवी चव्हाण, उमेदवार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार यांची भाषणे झाली.

आपली प्रतिक्रिया द्या