महिला पोलिसाचे होते सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध, दोघांनी मिळून केली पतीची हत्या

वसई पोलीस ठाण्यातील महिला पोलीसाचे तिच्याच ठाण्यातील सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. त्या दोघांच्या संबंधांबाबत महिलेच्या पतीला समजले होते त्यावरून त्यावरून त्या दोघांची सतत भांडणं होत होती. त्यामुळे महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला.

स्नेहल (25) असे त्या महिलेचे नाव असून तिचे पुंडलिक पाटील (35) याच्यासोबत लग्न झाले होते. त्या दोघांना तीन वर्षांची मुलगी देखील आहे. लग्न झालेले असले तरी स्नेहलचे तिच्यासोबत काम करणाऱ्या विकास पाश्टे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. विकासचे देखील सहा वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. तरी देखील हे दोघे खुलेआमपणे अनैतिक संबंध ठेवायचे. वसई पोलीस ठाण्यात सर्वांना त्यांच्या संबंधांविषयी माहित होते. पुंडलिक अनेकदा स्नेहलला डब्बा द्यायला यायचे त्यामुळे त्याच्याही कानावर स्नेहल व विकासच्या संबंधांविषयी आले होते. त्यावरून स्नेहलसोबत त्याचे वाद व्हायचे. त्यामुळे स्नेहलला विकाससोबत मिळून पुंडलिकचा काटा काढायचा ठरवला.

स्नेहलने विकासला अडीच लाख देऊन पुंडलिकला मारायची सुपारी देण्यास सांगितले. तसेच हा अपघात वाटेल असे दाखवायचे आहे असेही तिने सांगितले. त्यानुसार विकासने अविनाश भोईर, विशाल पाटील व स्वप्निल गोवारी यांना पुंडलिकला मारण्याची सुपारी दिली. त्या तिघांनी एक रिक्षा भाड्याने घेतली. मनोर जवळील ढेकले गावाबाहेर त्यांनी पुंडलिकला गाठले व त्यानंतर लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पुंडलिक हा वजनाने जड असल्याने त्या तिघांनाही त्याला उचलून त्याचा मृतदेह दुसरीकडे नेणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला रिक्षात बसवले व त्यानंतर ती रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात ढकलून दिली. त्यानंतर ते तेथून पळून गेले.

काही तासाने एका मोटारसायकल वाल्याला खड्ड्यात रिक्षा पडल्याचे दिसले त्यामुळे त्याने पोलिसांना कळवले. प्रथमदर्शी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. मात्र मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांना पुंडलिकचा मृत्यू डोक्यावर आघात झाल्याने झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी हत्येची नोंद करत त्या दिशेने तपास केला. त्या दरम्यान त्यांना पुंडलिकची हत्या करणाऱ्या तिघांची माहिती मिळाली. त्या तिघांकडून त्यांन विकास पाष्टे व स्नेहल यांच्याबाबत समजले. पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या