ऐतिहासिक वसईचा अनमोल ठेवा बेवारस

118

पुरातन शिल्प आणि शिलालेख झाले कपडे धुण्याचे दगड

मनीष म्हात्रे

वसई-  शूर्पारक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक वसईचा पुरातन ठेवा अक्षरशः बेवारस झाला आहे. ठिकठिकाणी खोदकाम करताना किंवा तलावातून मिळालेल्या हजारो, शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्ती, शिल्प आणि शिलालेख रस्त्याच्या कडेला अडगळीत पडल्या आहेत. मोडीलिपीत कोरलेल्या काही शिलालेखांचा वापर तर चक्क सार्वजनिक नळांखाली किंवा तलावांच्या काठी अक्षरशः कपडे धुण्यासाठी केला जात असून अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे एकाच जागी पडलेला हा ऐतिहासिक ठेवा आता अचानक गायब होऊ लागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्यासाठी तो चोरीला तर जात नाही ना? अशी भीती वसईकरांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.

शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेली वसईची भूमी  पुरातन शिल्प आणि शिलालेखांनी समृद्ध होती. रामायण, महाभारत, बौद्ध, जैन, सातवाहन, गौतमीपुत्र, शतकर्णी, शिलाहार, राजाबिंबदेव, मुघल आणि नंतर पोर्तुगीजांच्या काळात येथे अनेक शिल्प, स्थापत्य कला उदयास आल्या. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कला, संगीत, शिल्प, साहित्य याचबरोबर ज्ञान आणि विज्ञानाची निर्मिती करणारी भूमी म्हणून शूर्पारक नगरी अर्थात वसई प्रसिद्ध होती. या भूमीत १०८ पवित्र तीर्थ म्हणजेच तलाव असल्याची नोंद आहे. काही तलावांना स्नानासाठी दगडी घाट बांधले होते. त्यावर सुंदर शिल्पही होती. नक्षीदार मूर्ती व शिल्प पटांनी संपन्न अशी दोनशेहून अधिक मंदिरे वसईत होती. मात्र परकीय आक्रमणात यातील अनेक मंदिरे नष्ट करण्यात आली आणि मंदिरातील भग्न झालेल्या मूर्तींचे विसर्जन तलावात करण्यात आले.

vasai

आधुनिकीकरणात या तलावांचे खोदकाम करण्यात आले तसेच विहिरीतील गाळ काढून त्या पिण्यायोग्य करण्यात आल्या तेव्हा हा पुरातन ठेवा सापडला. अनेक ठिकाणी तलावांबाहेर अथवा रस्त्याच्या कडेला तलावातील उपसा म्हणून हा अनमोल ठेवा तसाच ठेवून देण्यात आला आणि तो कायमच दुर्लक्षित राहिला. आजही अशा शेकडो भग्न मूर्ती, शिल्प आणि शिलालेख वसई, विरारच्या परिसरात बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला किंवा मंदिराच्या बाजूला अडगळीत पडलेला आहे. निर्मळ येथील सुळेश्वर आणि सुपारा येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात अशा असंख्य भग्न मूर्ती आणि शिलालेख इतस्ततः पडलेले दिसतात. एकेकाळी सकाळ, संध्याकाळ या मूर्तींची, शिल्पांची पूजाअर्चा होत असे, पण इतिहासाची साक्ष देणारी ही शिल्पं, मूर्ती आणि शिलालेख आपले अस्तित्व हरवून बसले आहेत. अनेक तलावांच्या काठी आणि सार्वजनिक नळांच्या कडेला मोडीलिपीत कोरलेल्या शिलालेखांच्या शिळा अक्षरशः कपडे धुण्याकरिता वापरल्या जात आहेत. हा पुरातन ठेवा हळूहळू वसईतून गायब होत असल्याचे दिसू लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पुरातन शिल्पांना चांगली मागणी असल्यानेच हा ठेवा चोरला तर जात नाही ना, अशी भीती वसई किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गमित्रांसोबत झटणारे किल्ले वसई मोहीम परिवाराचे डॉ. श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केली.

महापालिकेने संग्रहालय बनवावे

दोन वर्षांपूर्वी वसईत माही-वसई महोत्सव भरविण्यात आला होता. यावेळी नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर वसईच्या पुरातन संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले होते. या महोत्सवानंतर वसईत माही-वसईसाठी संग्रहालय उभारण्याचा मानस  आयोजकांनी व्यक्त केला होता, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. या पुरातन दुर्मिळ मूर्ती, शिल्प आणि शिलालेख जतन करण्यासाठी महापालिकेने त्याचे संग्रहालय बनवावे अशी मागणी इतिहासप्रेमींमधून केली जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या