15 महिने डांबून ठेवत बलात्कार, नवजात मुलीसह तरुणीने केली कशीबशी सुटका

वसई पोलीस ठाण्यात एका तरुणीने अपहरण, बलात्कार आणि अनन्वित छळासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. या तरुणीला जवळपास 15 महिने डांबून ठेवलं होतं. या काळात तिच्यावर झालेल्या बलात्कारामुळे ती गर्भवती राहिली आणि एका मुलीला तिने जन्म दिला. तरुणीची प्रसुती झाल्यानंतर अपहरण करणाऱ्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी तिचा भयंकर छळ केला. कशीही या तरुणीने स्वत:ची सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले.

ही तरूणी वसई गावांत राहते. 2018 साली तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निखील बळीराम घरत याने तिला माझे तुझ्यावर प्रेम असून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असं म्हटलं होतं. निखीलला धुडकावून लावल्याने तो भडकला होता. त्याने या तरुणीला आत्महत्या करण्याची आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. ही धमकी देत त्याने मला एकांतवासात नेले बलात्कार केला असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

बलात्कार केल्यानंतर निखीलने या तरुणीला आपल्या घरी नेले आणि तिला तिथे डांबून ठेवले. निखीलच्या घरच्यांनी तरुणीकडून एका कागदावर लिहून घेतले की ती त्यांच्या घरी स्वखुशीने आली आहे. हे लिहून घेतल्यानंतर निखीलच्या घरच्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली असं या तरुणीने पोलिसांना सांगितले आहे. तिच्या गुप्तांगावर सिगारेटने चटके देण्यात आले आणि जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली. ही तरुणी बलात्कारामुळे गर्भवती राहिली होती आणि तिने एका मुलीला जन्मही दिला. मुलीचा जन्म झाल्यानंतर या तरुणीवरील अत्याचार वाढत गेले. हे सहन न झाल्याने अखेर तिने कसाबसा घरातून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी या प्रकरणी निखील आणि त्याच्या कुटुंबियांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या