धक्कादायक! अवघ्या 20 हजारांत बांगलादेशींना विकले ‘नागरिकत्व’,

1209

वसई-विरारमध्ये वर्षानुवर्षे बेकायदा वास्तव्य करणाऱया बांगलादेशी घुसखोरांकडे चक्क अर्नाळा ग्रामपंचायतीचे जन्मदाखले सापडले आहेत. अवघ्या 20 हजार रुपयांमध्ये हे जन्मदाखले बांगलादेशी घुसखोरांना विकून त्यांना ‘नागरिकत्व’च बहाल करण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी ग्रामपंचायतीकडे खुलासा मागितला असता ग्रामसेवकाने रजिस्टर फाटल्याचे कारण देत हात वर केले.

अर्नाळा सागरी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा आणि दहशतवादविरोधी पथकाने 15 दिवसांपूर्वी राजोडी, कळंब, अर्नाळा या ठिकाणी छापे घालून एकूण 23 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. या बांगलादेशी घुसखोरांची कसून चौकशी सुरू असताना त्यामधील दोघांकडे चक्क अर्नाळा ग्रामपंचायतीने दिलेले जन्मदाखले आढळून आले. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी अर्नाळा ग्रामपंचायतीला नोटीस दिली असून कुठल्या कागदपत्रांच्या आधारे हे जन्मदाखले दिले, याचा खुलासा मागितला आहे. अर्नाळा ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे असून जन्मदाखले देण्याचे काम येथील ग्रामसेवक पंकज संख्ये करतो. मात्र जन्म-मृत्यूचे रजिस्टर फाटले असून नेमके कुणाला आणि कधी दाखले दिले, त्याचा तपशील उपलब्ध नसल्याचे ग्रामसेवक पंकज संख्ये याने सांगितले. त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या संशयाची सुई ग्रामसेवक संख्येभोवती फिरत आहे.

संशयास्पद कारभार
वसई व पालघर येथील ग्रामपंचायतीतून ग्रामसेवकपदाकरून पंकज संख्ये याला निलंबित केले होते. या ग्रामसेवकाची कारकीर्द संशयास्पद असून चार वर्षांपूर्वी नागपूर हिवाळी अधिवेशनातही त्याच्या भ्रष्टाचाराविरोधात विषय पटलावर घेतला होता. केवळ दोघा बांगलादेशींनाच नव्हे तर बाहेरून आलेल्या शेकडो अनोळखी नागरिकांना पंकज संख्ये यांनी प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या मोबदल्यात जन्मदाखले दिल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे.

अक्षर, शाईची पडताळणी करा!
अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकज संख्ये याच्याकिरोधात ग्रामपंचायतीतील कारभारात गैरव्यवहार व कागदोपत्री फेरफारप्रकरणी विभागीय चौकशी सुरू आहे. ही व्यक्ती कागदोपत्री नकला करण्यात तरबेज आहे. पोलिसांना सापडलेला दाखला 1982 सालच्या असल्याचे समजते. त्यामुळे त्या सालच्या रजिस्टरची तपासणी करून अक्षर व शाईची पडताळणी करणे गरजेचे आहे. तशी मागणी आपण पंचायत समितीकडे करणार आहोत.
– जयप्रकाश ठाकूर, माजी उपसभापती, पंचायत समिती.

आपली प्रतिक्रिया द्या