नाशिकमध्ये भाजपला जोरदार धक्का; भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिकमध्ये भाजपाला मोठे खिंडार पडले आहे. माजी आमदार वसंत गिते आणि सुनिल बागूल या भाजपाच्या दोन्ही प्रदेश उपाध्यक्षांनी आज शुक्रवारी नाशिकमध्ये शिवसेनेत प्रवेश केला, हा भाजपाला मोठा धक्का असून महापालिकेतील सत्तेलाच हादरा बसला आहे. शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनी या दोघांचे स्वागत केले.

वसंत गिते आणि सुनील बागूल हे दोघेही भाजपाचे विद्यमान उपाध्यक्ष होते. गिते हे नाशिक मध्य मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. या दोघांच्या प्रवेशाने भाजपाच्या महापालिकेतील सत्तेला हादरा बसला आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस, मर्चंट बँकेचे संचालक प्रकाश दायमा, शोभा मगर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

हॉटेल एक्प्रेस इन येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी उपनेते बबनराव घोलप, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, सुनील पाटील, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, डी. जी. सूर्यवंशी, निवृत्ती जाधव, राजेंद्र नाठे, भगवान आडोळे, संतोष गायकवाड, कुलदीप चौधरी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक हजर होते.

भक्कम बालेकिल्ला होईल

गिते आणि बागुल यांच्यासाठी शिवसेना नवीन नाही. ते जुने जाणते आहेत. राजकारण, समाजकारण आणि कामगार क्षेत्रातील ते दिग्गज आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांचे पक्षात स्वागत करीत असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्य़ांनी, शिवसैनिकांनी त्यांचे आनंदात स्वागत केले आहे. हे दोघेही पुन्हा एकदा शिवसेनेच्या भगव्या शालीखाली आले असून ही शाल आता अधिक उबदार व तेजस्वी होईल. नाशिक शहर व जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला होईल, अभेद्य गड होईल. यात या दोघांचेही महत्त्वाचे योगदान राहील, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या