रेषा अबोल झाली!

वसंत सरवटे यांच्या निधनाने व्यंगचित्र कलेतील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. त्यांच्या बोलक्या कुंचल्याची रेषाच आता अबोल झाली आहे. व्यंगचित्र हा साहित्य प्रकार आहे हे वाचकांच्या मनावर ठसवणारा रेषांचा किमयागार म्हणजे वसंत सरवटे. अनेक महनीय व्यक्तींना अर्कचित्रांतून अजरामर करणार्‍या सरवटेंच्या याच चित्रकौशल्याचा मोह कदाचित स्वर्गस्थ देवादिकांनाही झाला असावा. सरवटेंचा सरावलेला कुंचला तिथेही प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही!
रेषांनाही बोलके करण्याचे अद्भुत सामर्थ्य असणार्‍या वसंत सरवटे यांचा कुुंचला शांत झाला आहे. व्यंगचित्र आणि अर्कचित्र कलेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्‍या वसंत सरवटे यांच्या निधनाची बातमी शनिवारी मराठी भाषेतील अग्रगण्य सारस्वतांपासून मराठी भाषेच्या सामान्य साहित्यरसिक वाचकांपर्यंत सार्‍यांनाच चटका लावून गेली. वसंत सरवटे या नावाचे उच्चारण ऐकल्याबरोबर डोळ्यांसमोर उभी राहतात ती रेषांच्या सहज फटकार्‍यांनी त्यांनी अजरामर केलेली चित्रे! त्यापाठोपाठ डोळ्यांसमोर तरळते ती प्रत्येक चित्राखाली त्यांनी मराठीत केलेली झुबकेदार स्वाक्षरी. व्यंगचित्रे, रेखाटने, अर्कचित्रांचा अमाप ठेवा कलासक्त रसिकांच्या स्वाधीन करून वसंत सरवटेंनी जगाचा निरोप घेतला. केवळ व्यंगचित्रकार असा उल्लेख करणे सरवटेंच्या आत दडलेल्या नखशिखांत कलावंतावर अन्याय करण्यासारखे होईल. अभियांत्रिकी शाखेची पदवी घेऊनही वसंतराव इंजिनीअरिंगच्या तांत्रिकतेमध्ये कधी गुरफटलेच नाहीत. त्यांच्यातील निसर्गदत्त चित्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळेच चित्रकलेचे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण न घेता केवळ छंदातून घडलेल्या या कलावंताने चित्रांच्या दुनियेतच विलक्षण अशी कामगिरी केली. थोडीथोडकी नव्हे, तब्बल चार दशके व्यंगचित्रांच्या आणि अर्कचित्रांच्या प्रांतात मुशाफिरी करतानाच त्यांनी मराठी साहित्याच्या क्षेत्रात आपले
अधिराज्य
निर्माण केले. रसिक, वाचकांची मने काबीज केली. ‘ललित’ या वाङ्मयीन मासिकासाठी त्यांनी जे योगदान दिले ते तर विक्रमीच म्हणावे लागेल. ‘ललित’च्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक तर होतेच, पण ‘ललित’च्या दिवाळी अंकासाठी सलग पन्नास वर्षे मुखपृष्ठ रेखाटण्याचा अद्भुत पराक्रम त्यांनी केला. ‘ललित’च्या प्रत्येक वर्षीच्या दिवाळी अंकाचे त्यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ म्हणजे जाणकार साहित्य रसिक आणि वाचकांसाठी मोठे आकर्षणच असायचे. साहित्यातील घडामोडींपासून इंग्रजी भाषेचे मराठी माध्यमावरील आक्रमण, वाढत्या शहरीकरणामुळे होणारे विद्रूपीकरण, टी.व्ही.मुळे आलेला अतिरेक अशा अनेक विषयांवर सरवटेंनी रेषांच्या कलेतून भाष्य केले. याशिवाय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि जीवनातील विसंगतींवर तिरकस कटाक्ष टाकून वाचकांना खुदकन हसवण्याचे कसबच त्यांच्या कुंचल्यात होते. ‘ललित’ मासिकात प्रख्यात कादंबरीकार जयवंत दळवी यांचे साहित्यविश्‍वावर मार्मिक टिप्पणी करणारे ‘ठणठणपाळ’ हे सदर येत असे. दळवींचे लेखन तर वाचकांच्या पसंतीला उतरलेच, पण आपल्या रेषांच्या फटकार्‍यांनी वसंत सरवटेंनीदेखील हा ‘ठणठणपाळ’ तेवढ्याच ताकदीने अजरामर केला. सरवटे हे व्यंगचित्रकारच नव्हे तर उत्कृष्ट चित्रकारही होते. पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर व अनेक ख्यातकीर्त लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे सरवटेंनीच रेखाटली. कमीत कमी रेषांमधून मोठा आशय सांगणे ही त्यांची हातोटी होती. त्यांनी केवळ हसवण्याचेच काम केले नाही तर
रेषांच्या माध्यमातून
माणसाला विचार करायलाही भाग पाडले. क्वचितप्रसंगी त्यांच्या चित्रांवर दुर्बोधतेचाही आरोप झाला. मात्र त्याचाही राग त्यांनी कधी मानला नाही. किंबहुना रसिकांनी चित्राच्या आत डोकावून त्यातील आशय समजून घ्यावा, असा त्यांचा आग्रह असे. केवळ व्यंगचित्रे काढूनच ते थांबले नाहीत तर या कलेविषयी जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी विपुल लेखनही केले. ‘संवाद रेषालेखकांशी’, ‘खेळ चालू राहिला पाहिजे’, ‘खेळ रेषावतारी’, ‘सावधान कुठे वळण आहे’, ‘व्यंगचित्र एक संवाद’, ‘खडा मारायचा झाला तर’ ही त्यांची पुस्तकेही चांगलीच गाजली. सरवटे यांच्या तीन व्यंगचित्रसंग्रहांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट या संस्थेने २००९ साली त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले होते. ३ फेब्रुवारी १९२७ रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या वसंत सरवटे यांनी वयाच्या सतराव्या वर्षी व्यंगचित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. तेव्हापासून सुरू झालेला हा चित्रमय प्रवास आता ८९ व्या वर्षी थांबला आहे. वसंत सरवटे यांच्या निधनाने व्यंगचित्र कलेतील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. त्यांच्या बोलक्या कुंचल्याची रेषाच आता अबोल झाली आहे. व्यंगचित्र हा साहित्य प्रकार आहे हे वाचकांच्या मनावर ठसवणारा रेषांचा किमयागार म्हणजे वसंत सरवटे. अनेक महनीय व्यक्तींना अर्कचित्रांतून अजरामर करणार्‍या सरवटेंच्या याच चित्रकौशल्याचा मोह कदाचित स्वर्गस्थ देवादिकांनाही झाला असावा. सरवटेंचा सरावलेला कुंचला तिथेही प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही!