विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात वास्तुदोष निवारण

28

सामना ऑनलाईन। भोपाळ

वास्तुदोषामुळेच गेल्या १४ वर्षांपासून काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये सत्ता मिळू शकली नाही असा दावा वास्तुविशारदांनी केल्याने काँग्रेसने मध्य प्रदेशातील आपल्या मुख्यालयात वास्तुदोष निवारण करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या १४ वर्षांपासून मध्य प्रदेशच्या सत्तेपासून लांब असलेल्या काँग्रेसला आता सत्ता मिळवण्याचे वेध लागले आहेत. त्यातच काँग्रेसची कमान पक्षाध्यक्ष राहुल गांधीवर असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काही नवीन बदल घडतील असा विश्वास वाटू लागल्याने मध्य प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्याचे स्वप्न कार्यकर्ते बघत आहेत. त्यातच लवकरच मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका हातातून जाऊ नयेत, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांवर ज्येष्ठ नेत्यांकडून दबाव येत असल्याचे वृत्त आहे. यासाठी सर्व कनिष्ठ नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

याच दरम्यान मुख्यालयाच्या वास्तुतच दोष असल्याने काँग्रेस १४ वर्षांपासून तोंडावर आपटत असल्याचा दावा वास्तुविशारदांनी केला. यामुळे खडबडून जागे झालेल्या काँग्रेसने वास्तुदोषाचे निवारण करण्यासाठी मुख्यालयात तोडफोड सुरू केली आहे. वास्तू दोष निवारण केल्यामुळे या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित आहे असा विश्वास नेत्यांना आहे. यासाठी मुख्यालयातील शौचालयांची जागा बदलण्यात येणार आहे. यातील तीन शौचालय काँग्रेस प्रवक्त्याच्या रुमला लागून असल्याने त्यातील नकारात्मक उर्जा सगळी कामं बिघडवत असल्याच वास्तू विशारदांच म्हणण आहे. यामुळेच हा खटाटोप सुरू असल्याच एका काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे.

या मुख्यालयाचे उद्घाटन २००६ साली काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर या मुख्यालयात विधानसभा निवडणुकांसंबंधित बैठकांचे आयोजन केले जात होते. दिल्लीहून अनेक बडे नेते मुख्यालयात निवडणुकांवरील चर्चा व विचारविमर्श करण्यास यायचे. याच मुख्यालयात निवडणुकांची रणनीतीही आखली जायची, यामुळे काँग्रेससाठी हे मुख्यालय महत्त्वाचे मानले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या