Video – पुरूषांनी साजरी केली वटपौर्णिमा, जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी केली प्रार्थना

1530

कुडाळ शहरातील गवळदेव येथे शुक्रवारी पुरूषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे गेली नऊ वर्षे पुरूष मंडळी एकत्र येत आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करीत अनोखी प्रथा जोपासत आहेत. महीला जशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात तशीच प्रार्थना पुरुषांनी हीच पत्नी मिळावी यासाठी केली. पत्नीला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थनाही पुरुषांनी केली. पुरुषांप्रमाणेच कुडाळ तालुक्यात महिलांनी सर्वत्र वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली.

कुडाळ येथे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळणकर व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून गेली नऊ वर्षे पुरूष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत आहेत. यंदाही मोठ्या उत्साहात महीलांप्रमाणेच पुरूष वर्गानेही वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी उमेश गाळणकर, डॉ.संजय निगुडकर, प्रा.अरूण मर्गज, डॉ.व्यंकटेश भंडारी, परेश धावडे, प्रा.नितीन बांबार्डेकर, किरण करंदीकर, पांडुरंग पाटकर, प्रसाद परब, रोशन राऊळ, प्रसाद कानडे, प्रितम वालावलकर, किरण सावंत, संतोष पडते, सुरेश वरक, बळीराम जांभळे आदींसह पुरूष मंडळी उपस्थित होती.

आपली प्रतिक्रिया द्या