‘आयफा’ला लागलं मराठी चित्रपटाचं ‘वेड’, अबुधाबीत रंगला दिमाखदार पुरस्कार सोहळा

यंदाचा ‘आयफा’ पुरस्कार सोहळा अबुधाबीमधील यस आयलंड येथे शनिवारी रंगला. या वेळी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. पुरस्कार सोहळय़ात मराठीचा डंका वाजला. मराठी चित्रपट ‘वेड’ला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. रितेश आणि जेनिलिया दोघांनी परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानले.

आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आलिया या सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. अनिल कपूरला ‘जुग जुग जिओ’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. कमल हसन यांना हिंदुस्थानी चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला. ‘दृश्यम 2’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंह, नोरा फतेही, सुनिधी चौहान, बादशाह अशा अनेक कलाकारांनी कला सादर केली.

– पुरस्कार सोहळय़ात हृतिक रोशनने ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना हृतिक म्हणाला, ‘विक्रम वेधा’चा पहिला शॉट मी अबुधाबीत दिला होता. मला असे वाटते की, वेधासोबतचे माझे आयुष्य जिथून सुरू झाले ते परत आले आहे. वेधाने मला माझ्या व्यक्तिमत्त्वाची ती बाजू दाखवून दिली आहे, जी मला स्वतःला माहीत नव्हती.’’