दिल्लीला जा, ज्यांना भेटायचं त्यांना भेटा पण प्रकल्प महाराष्ट्रात आणा! अजित पवार संतापले

महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले आहेत. अजित पवार यांनी बुधवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणा असे सांगितले होते. गुरुवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कडक शब्दात सुनावले. “आपल्या महाराष्ट्रात येणारा प्रकल्प कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे किंवा कोणाला विरोध करता येत नाही म्हणून जात असेल तर ही बाब महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. दिल्लीला जा, ज्यांना भेटायचं त्यांना भेटा पण प्रकल्प महाराष्ट्रात आणा” असे अजित पवार यांनी बजावले आहे.

प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर होणाऱ्या टीकेमुळे अडचण झाल्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याने त्यांनी काढलेली ही पळवाट असून, प्रकल्प बाहेर जात असल्याने हा गाजर दाखवायचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प ठेवून दुसरा प्रकल्प राज्यात आला तर बिघडतं कुठे असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. ज्यातून महाराष्ट्राचं भलं होईल, पर्यावरणाचा विचार होईल, कोणतेही वातावरण खराब होणार नाही असे प्रकल्प असतील ज्यातून रोजगारप निर्मिती होईल, गुंतवणूक वाढेल , राज्याचा विकास होईल असे प्रकल्प राज्यात आलेच पाहिजेत असे पवार यांनी म्हटले आहे.