फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रोजेक्ट मोदी देतील, उदय सामंत यांची सारवासारव

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याचे दुःख आम्हालाही आहे. पण त्याचे राजकारण करू नका. फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची सारवासारव आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे केली.

 शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला आंदण दिल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली. आज नवी मुंबईत बॉइलर इंडिया 2022 या तीन दिवसीय चर्चा सत्राचे उद्घाटन करण्यासाठी उदय सामंत आले होते. यावेळी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा, असा सवाल पत्रकारांनी केला. तेव्हा सामंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. पण याहीपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार आहे. तसे आश्वासन मोदी यांनी दिले आहे.