महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातने पळवला, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले आश्चर्य

महाराष्ट्राचे माजी पर्यावरणमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला एक प्रकल्प आता गुजरातमध्ये गेल्याचे ट्विटद्वारे लोकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प  हा महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडीने मजबुतीने प्रयत्न केले होते.

पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे आणि तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी अनेक बैठका घेत , भेटीगाठी केल्या होत्या. पुण्याजवळ हा प्रकल्प येणार असे जवळपास निश्चित झाले होते. मधल्या काळात एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी राज्यात सरकार स्थापन केले आणि मविआच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली. आता हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत कळवलं आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो.”

आदित्य ठाकरेंनी पुढे म्हटले आहे की, “हा प्रोजेक्ट इतर राज्यात गेला त्याचे दुःख नाही, पण आपल्या राज्यात का आला नाही, याचे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून मविआ सरकारने एवढं पाठबळ देऊनही हा प्रोजेक्ट तिथे जाणे, याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणुकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही.”