भाज्यांचा सण

तुषार देशमुख (शेफ) 

हे दिवस भाज्यांचे… गोडव्यासोबत विविधरंगी भाज्याही संक्रांतीत तितक्याच महत्त्वाच्या असतात.
आपले सण ऋतुमानाप्रमाणे साजरे होतात आणि या ऋतुमानात पिकणाऱया विविध भाज्या, फळे यांचा वापर करूनच त्या त्या सणांत विशेष सेवन केले जाते. या गोष्टींचा खोलवर विचार करता एक लक्षात येते की या सणांमध्ये खाल्ले जाणारे अनेक पदार्थ बनवायला वेळ लागतो सोबतच एखाद्या सणाला बरेच पदार्थ करावे लागतात. त्या मागे जुन्याजाणत्या माणसांचा एक विचार असावा असे राहून राहून वाटते. एकत्र कुटुंब पद्धतीत सर्वांना समान आणि एकत्र काम करता यावे, स्नेह वाढावा, आपसातले रुसवेफुगवे मिटावे आणि एकत्र गुण्यागोविंदाने सर्वांनी नांदावे.. याचा विचार व्हावा.
तसेच आपल्या खाद्यपदार्थांचे पहा ना.. उदाहरण द्यायचे झाले तर पोपटी म्हणजे संमिश्र भाज्या एकत्र होऊन आनंद देणारी एक चविष्ट भाजी. आज मांडावीशी वाटतेय याचे कारण थंडीत विशेष करून ही बनवली जाते. सगळे कुटुंब एकत्र येऊन हे बनवते. शेतावर, जमिनीत खड्डा करून त्यात शेकोटी पेटवून मातीच्या मडक्यात भाज्यांना मसाला लावून ‘भांबुर्डीच्या पाल्यात’ शिजवले जाते. आताही बऱ्याच गावांमध्ये ही पोपटी मोठय़ा उत्साहात केली जाते. तसेच हुरडा पार्टी हे नाव प्रचलित झाले. मात्र हुरडा आणि उसाचा ताजा रस शेतातली थंडी अनुभवत चाखण्यात जो आनंद आहे तो शब्दांत मांडता येणार नाही.
या दिवसात ताज्या भाज्यांचं जणू साम्राज्यच असतं.. आणि या साम्राज्याचे सुदृढ नागरिक आपण नक्कीच होऊ शकतो. फक्त आपल्याला या भाज्यांचे अधिराज्य आपल्या आहारात मान्य करता आले पाहिजे.

पोपटी
साहित्य – १ वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी तुरीचे दाणे, ७ ते ८ छोटे बटाटे, १ वाटी उभे चिरलेले गाजराचे तुकडे, अर्धी वाटी भुईमुगाचे दाणे, अर्धी वाटी हरभरा, १ वाटी रताळ्याचे तुकडे, ३ काटेरी वांगी, २ ते ३कणक कंद, १ वाटी कोनफळाचे तुकडे, १ वाटी शेवग्याच्या शेंगा, अर्धी वाटी वाल पापडीचे दाणे, १ वाटी उभा चिरलेला कांदा, ४ चमचे चिंचेचा कोळ, आवडीप्रमाणे गूळ, १ चमचा जिरं, २  तुकडे दालचिनी, किंचित ओवा, ४ लवंगा, ४ ते ५ काळीमिरी,४ ते ५ वेलची, १ चमचा बारीक चिरलेलं आलं, १ चमचा बारीक चिरलेला लसूण, १ जावित्री फूल, १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, २ तमालपत्र, २ स्टार फूल, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, तेल, जाड मीठ आणि मातीचं मडकं.
कृती – प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून उभा चिरलेला कांदा, सगळा मसाला, पाणी घालून चांगलं परतून घ्या व मिश्रण एकजीव करा. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये पाणी घालून जाडसर वाटून घ्या. तयार वाटण एका बाऊलमध्ये काढून त्यात सर्व भाज्या घालून चांगलं मॅरिनेट करा. नंतर मडक्यात थोडं तेल घालून ते आतील सर्व बाजूंना लागेल असं फिरवा. नंतर सर्व मॅरिनेट केलेल्या भाज्या केळीच्या पानात भरून मडक्यात टाका. मडक्यात वरून थोडा ओवा व पुदीन्याची पानं घालून पुन्हा त्यात केळीचं पान घाला. नंतर मडक्यात जाडसर मीठ पसरवा व १५ मिनिटं ठेवून द्या. नंतर शेगडीवर मडकं उपडं ठेवून २० ते ३० मिनिटं भाजून घ्या. पोपटी तयार.

आपली प्रतिक्रिया द्या