हुंडाबळी! नवविवाहितेने आत्महत्येपूर्वी वडिलांना जखमांचे फोटो पाठवले

हुंडाप्रथा बंद असली तरी आजही अनेक ठिकाणी हुंडा घेतला जातो. याचे आणखी एक ताजे प्रकरण समोर आले आहे.  हुंड्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना केरळमध्ये घडली आहे. आत्महत्येपूर्वी आपल्यावर करण्यात आलेले अत्याचार आणि शरीरावरील जखमांचे फोटो वडिलांना पाठवत तरुणीने आयुष्य संपवले आहे.

केरळमधील कोलम जिल्ह्यात राहणाऱ्या आणि आयु्र्वेदाचा अभ्यास करणाऱ्या विस्मया नायर हिचा विवाह मार्च 2021 मध्ये एस.किरण कुमार याच्याशी झाले होते. तो मोटर वाहन विभागात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत होता. लग्नात विस्मयाच्या वडिलांनी त्यांच्या परिस्थितीनुसार हुंडा दिला होता. या हुंड्यात एक एकर जमीन, एक कार आणि 10 लाखांचे दागिने दिले होते. मात्र तरीही जावई खूश नव्हता. त्याला आपले मूल्य जास्त असल्याचे वाटत होते. त्यामुळे कमी हुंडा मिळाल्याने तो निराश होता. लग्नाच्या अवघ्या काही दिवसात तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला आणि तीन महिन्यातच सगळ काही संपून गेलं.

किरणकुमारने आणखी दहा लाखांची मागणी केली होती. मात्र एवढे पैसे जमणार नसल्याचे सांगितल्यावर तो तिला हुंड्यासाठी त्रास देऊ लागला. सतत तिला हुंड्यावरुन टोमणे मारत होता. एवढेच नव्हे तर तो तिला मारहाणही करत असे. ती सततच्या त्रासाला कंटाळली होती. आत्महत्येपूर्वी तिने आपल्यावर करण्यात आलेले अत्याचार आणि शरीरावरील जखमांचे फोटो वडिलांना व्हॉट्सअॅप केले होते. केरळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील तपासानंतर आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल.

विस्मयाच्या वडिलांनी सांगितले की, एकदा एस. किरण कुमारने त्यांच्या डोळ्यादेखत मुलीला मारहाण केली होती. ती रागाने माहेरी आली होती.  मात्र तिला समजावून त्यांनी सासरी पाठवले. आपली मुलगी इतक्या टोकाचे पाऊल उचलेल हे माहित असते तर त्यांनी तिला कधीही पाठवले नसते. माध्यम अहवालानुसार राज्य महिला आयोगाने गुन्हा नोंदवून पोलिसांकडून माहिती मागवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या