मुलं जन्माला घालण्यासाठी सेक्सची गरज नाही!

49

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

स्त्री-पुरुष संबंधांतून नव्या जीवाचा जन्म होतो मात्र येत्या ३० वर्षात विज्ञान एवढी प्रगती करेल की, सेक्सशिवाय अर्थात स्त्री-पुरुष संबंधांशिवाय बाळाचा जन्म होऊ शकेल. स्त्री-पुरुषाच्या डीएनएद्वारे प्रयोगशाळेतच नवीन जीवाची निर्मिती शक्य होईल, असे भविष्य स्टॅन्फर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक हँक ग्रीली यांनी वर्तवले आहे. ग्रीली स्टॅन्फर्ड विद्यापीठातील लॉ स्कूलच्या सेंटर फॉर लॉ अँड द बायोसायन्सेसचे संचालक आहेत.

ग्रीली यांच्या मते, पुढील तीन दशकांत मानवी प्रजनन प्रक्रियेत आमूलाग्र बदल होतील. विज्ञानाच्या आधारावर प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने भ्रूण विकसित करता येईल. स्त्री-पुरुषाच्या डीएनएद्वारे प्रयोगशाळेत अनेक भ्रूण निर्माण केली जातील. त्यामधून आई-वडील आवडेल त्या भ्रूणाची निवड करतील.

ग्रीली यांनी दिलेल्या माहितीनुसार, निरोगी बाळ जन्माला यावं यासाठी आधी मातेच्या त्वचेच्या नमुन्यातून स्टेम सेल बनवले जाते आणि त्या स्टेम सेलचा वापर स्त्रीबीजासाठी केला जातो. हे बीज शुक्राणूंसोबत फलित करून भ्रूण तयार केले जाते. भ्रूण कृत्रिमरित्या फलित होणार असल्याने बाळाच्या केसांचा, डोळ्यांचा आपल्याला हवा तसा रंगही निवडता येणार आहे.

प्रा. हँक यांचा हा संपूर्ण संशोधन प्रकल्प अर्काइव्ह्ज ऑफ सेक्शुअल बिहेविअरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. स्त्री-पुरुषाच्या शारीरिक संबंधांचा आलेख आतापासूनच घटता आहे. त्यामुळे भविष्यात तंत्रज्ञानाचा वापर करून शारीरिक संबंध न ठेवताही नवीन जीव जन्माला घातला जाऊ शकतो असे प्राध्यापक हँक ग्रीली यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या