ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी शुश्रुषा रुग्णालयामध्ये दाखल, प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (वय – 94) यांची तब्येत बिघडली असून त्यांना दादर इथल्या शुश्रुषा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय.

‘पद्मश्री’ तसेच ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला. 1943मध्ये त्यांनी अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले. मराठी आणि हिंदी सिनेमांत चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले.

अभिनयाच्या क्षेत्रात सुलोचना यांना भालजी पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या तालमीत सुलोचनादीदी तयार झाल्या. आपल्या सोज्वळ दिसण्याने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांच्या मनात सुलोचनादीदी म्हणजे सोज्वळ, शांत आई अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. सिनेमांमध्ये त्यांनी घरंदाज भूमिका साकारल्या होत्या.

सुलोचनादीदींनी 250हून अधिक मराठी तसेच हिंदी सिनेमांत आपल्या अभियानाची छाप पाडली. ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट तुफान गाजले. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर चित्रपट ठरले.

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचनादीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांचा मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी 30 ते 40 चित्रपट केले असतील. ‘दिल देके देखो’ या 1959 मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली. त्यानंतर 1995 पर्यंत त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या ‘आई’ची भूमिका वठवली.