ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या सुमित्रा भावे यांचे निधन

ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या सुमित्रा भावे यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या जाण्याने पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱया प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.

सुमित्रा भावे यांचा जन्म 12 जानेवारी 1943 मध्ये पुण्यात झाला. मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ‘ग्रामीण विकास’ विषयात पदविका मिळविली. त्यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. अपघातानेच त्या लघुपटाकडे वळल्या. सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या लघुपटाच्या लोकप्रियतेनंतर त्यांनी 1995 मध्ये ‘दोघी’ हा चित्रपट तयार केला.

त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप चा’, ‘संहिता’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट गाजले. ‘दिठी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. ‘फिर जिंदगी’, ‘बाधा’, ‘बेवक्त बारिश’, ‘मोर देखने जंगल मे, ‘वास्तुपुरुष’, ‘संहिता’, ‘हा भारत माझा’ या काही निवडक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नावाजले गेले; तर अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या सामाजिक प्रश्न हाताळणाऱया त्यांच्या चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे.

त्यांनी सुमारे 14 चित्रपट, 50हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिका केल्या. या सर्व मालिकांचे लिखाण सुमित्रा भावेंचे आहे. त्यांच्या ‘कासव’ चित्रपटाने 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘सुवर्ण कमळ’ पटकावला होता.

संवेंदनशील दिग्दर्शिका हरपली

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ती आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून केलेले काम या दोन्ही क्षेत्रासाठी यापुढेही मार्गदर्शक ठरेल. समाजातील संवेदनशील विषयावर भाष्य करण्यासाठी त्यांनी चित्रपट या माध्यमाच्या ताकदीचा पुरेपूर कापर केला. उत्तम चित्रपट निर्मितीबरोबरच त्यांनी समाजप्रबोधनातही मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली काहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या