ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे आज रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे, सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे.

श्रीकांत मोघे यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1929 रोजी सांगली जिह्यातील किर्लोस्करवाडी येथे झाला. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात ‘चॉकलेट हीरो’ अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड झाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱयावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी यातील ‘दिल देके देखो’या गीतावर रंगमंचावर अक्षरशः शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी श्रीकांत मोघे यांची ओळख होती.

श्रीकांत मोघे हे नाटय़, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता याबरोबरच ते चित्रकार व वास्तुविशारद होते. उत्तम सुगम संगीत गायकही होते. श्रीकांत मोघे यांचे वडील कीर्तनकार होते. श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बीएसस्सीसाठी ते पुण्याच्या स. प. महाविद्यालयात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी. आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाटय़अभिनयाकडे वळले.

महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले. श्रीकांत मोघे यांनी साठहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत. ‘पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबईचा दौरा केला. श्रीकांत मोघे यांनी 1951-52 मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती. पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने 1955 साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाटय़स्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.

श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाटय़प्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे प्रकाशन 6 फेब्रुवारी 2015 रोजी बेळगाव येथे भरलेल्या नाटय़संमेलनात झाले होते.

पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सन्मान

पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले, परंतु अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका तत्कालीन केंद्र सरकारातले तत्कालीन नभोवाणीमंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली.

पुढे श्रीकांत मोघे यांनी 1956 मध्ये दिल्लीत संगीत नाटक अकादमीत नोकरी करायला सुरुवात केली. 1957 साली पहिल्या स्वातंत्र्यलढय़ाच्या शताब्दीनिमित्त आयोजित सेंटेनरी ड्रामा फेस्टिव्हलमध्ये ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील नायक म्हणून काम करणाऱया श्रीकांत मोघे यांच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद तसेच अनेक मंत्र्यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला.

आपली प्रतिक्रिया द्या