ज्येष्ठ मराठी नाटय़ व साहित्य समीक्षक, संशोधक प्रा. विजय तापस यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेले काही महिने कर्परोगावर उपचार सुरू होते. अंधेरी येथील खासजी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रा. तापस यांनी दीर्घकाळ मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात मराठी विभागात अध्यापन केले आणि त्याबरोबरच महाविद्यालयाच्या इतिहासाचे लेखनही केले. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारे लेखन करण्याचा प्रयोग त्यांनी केला. मराठी नाटय़ समीक्षा, मराठी नाटकांचा इतिहास, मराठी नाटकाचे सामाजिक अन्वयन आणि जागतिक रंगभूमीवरील विविध प्रयोग यावर त्यांनी विपुल लेखन, संशोधन केले. अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातून सातत्याने स्तंभलेखन केले. प्रा. तापस त्यांनी संपादित केलेली पुस्तके हा संपादनाचा वस्तुपाठ मानली जातात. संशोधनावर आधारित अभ्यासपूर्ण लेखन आणि त्यातून सामाजिक दस्तावेजीकरण हे त्यांचे वैशिष्टय़. कविता हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय. त्यांनी माया अँजेलोच्या कवितांचा भावानुवाद केला. शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे मराठी रुपांतर केले. प्रा. तापस हे अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी डॉ. पुष्पलता राजापुरे- तापस व कन्या डॉ. शाब्दा तापस असा परिवार आहे.