रंगभूमीचा उपासक हरपला! मोहनदास सुखटणकर यांचे निधन

ज्येष्ठ नाटय़कलावंत आणि दी गोवा हिंदू असोसिएशनचे आधारस्तंभ मोहनदास सुखटणकर यांनी आज वयाच्या 93 वर्षी अंधेरी येथील घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुखटणकर यांनी रंगभूमी आणि चित्रपटांत अनेक लहान -मोठय़ा भूमिका करतानाच  निम्म्याहून अधिक आयुष्य दी गोवा हिंदू असोसिएशनसाठी वाहिले. संस्थेचा खंदा कार्यकर्ता बनून पडेल ते काम करत राहिले. संस्थेने 50 हून अधिक नाटकांची निर्मिती केली, त्यांनी एकाही प्रयोगाचे मानधन घेतले नाही. रंगभूमी हाच त्यांचा श्वास राहिला, तो त्यांनी अखेरपर्यंत जपला. मोहनदास सुखटणकर यांच्या निधनाने रंगभूमीचा सच्चा उपासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.

मोहनदास सुखटणकर यांनी ओरिएन्टल इन्शुरन्समधील नोकरी सांभाळून आयुष्यभर रंगभूमीची सेवा केली. रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, दुर्गा, स्पर्श, आभाळाचे रंग आणि मस्त्यगंधा या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘पैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांत अभिनय केला.

सुखटणकर मूळचे गोव्याचे. माशेल हे त्यांचे गाव. शिक्षणासाठी ते मुंबईत आले. त्यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य होते. मोहनदास सुखटणकर यांनी जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र्ा’ विषय घेऊन ‘बी.ए.’ केले. पुढे आयएनटी स्पर्धेत भाग घेतल्यानंतर दी गोवा हिंदू असोसिएशन हा महत्त्वाचा टप्पा त्यांच्या आयुष्यात आला. 1958 मध्ये त्यांनी ‘गोवा हिंदू’मध्ये कलाकार म्हणून प्रवेश केला. संस्थेच्या ‘संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’, ‘मृच्छकटिक’, ‘होनाजी बाळा’ आदी नाटकांतून काम केले. पुढे संस्थेसाठी कार्यकर्ता म्हणून काम करायचे ठरवले. ते त्यांनी अखेरपर्यंत केले. सुखटणकर दी गोवा हिंदू असोसिएशन संस्थेत 1955 ते 2005 दरम्यान कार्यरत होते. संस्थेने खडाष्टक, संशयकल्लोळ, शारदा, मृच्छकटिक, करेन ती पूर्व ही जुनी नाटपं केली. दरवर्षीला एक नाटक रंगभूमीवर आणले. जयवंत दळवींच्या ‘स्पर्श’मध्ये त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका साकारली. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या निवडक मराठी मालिका तर ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

शब्दकळा कुसुमाग्रजांच्या

 सुखटणकर यांना कविवर्य कुसुमाग्रज यांचा निकटचा सहवास लाभला. कुसुमाग्रजांच्या आशीर्वादानेच त्यांनी शशी मेहता यांच्यासोबत  ‘शब्दकळा कुसुमाग्रांच्या’ हा कार्यक्रम सुरू केला. त्यात  ‘नटसम्राट’मधील स्वगतं घेतली. कुसुमाग्रजांनीच त्याची जोड करून दिली. त्याचे शेकडो कार्यक्रम त्यांनी देशविदेशात केले.

खंदा कार्यकर्ता आणि ऐनवेळी रिप्लेसमेंट

दी गोवा हिंदू असोसिएशन संस्थेच्या नाटकांचे जे काही 10 हजार प्रयोग झालेत त्यापैकी चार-साडेचार हजार प्रयोगांत सुखटणकर यांनी काम केलेय. त्यापैकी हजारभर प्रयोगात त्यांनी  ‘रिप्लेसमेंट’ म्हणून काम केले.  कुणी कलाकार आला नाही की  ऐनवेळी ते रंगमंचावर उभे राहायचे.  प्रयोग रद्द करण्याची वेळ येऊ द्यायचे नाहीत. ‘नटसम्राट’ नाटकात तर त्यांनी सगळ्या भूमिका केल्या, फक्त नटसम्राट सोडून…