जास्त नफ्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक, ठाण्यातील ज्वेलर्सच्या मालकाला अटक

जास्त नफ्याचं आमीष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्यातील व्हिजीएन ज्वेलर्सच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

या ज्वेलर्सच्या मालकाचं नाव विराट गोपालन नायर असं आहे. नायर याला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. या प्रकरणात तब्बल 50 हजार जणांची फसवणूक करण्यात आली असून सुमारे 100 कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिजीएन ज्वेलर्स ही सराफ पेढी 80च्या दशकापासून ठाण्यात आहे. मूळच्या केरळ इथल्या नायरने एक विश्वासू ज्वेलर्स म्हणून ठाणे आणि आसपासच्या परिसरातील मल्याळी समुदायामध्ये ओळख निर्माण केली होती. त्याच बळावर त्याने मुलुंड, डोंबिवली, उल्हासनगर इत्यादी भागांमध्ये आपल्या पेढीच्या शाखा सुरू केल्या.

या अपहाराला साधारण 2006मध्ये सुरुवात झाली. नायरने त्याच्या ग्राहकांना जास्त नफ्याचं आमिष दाखवलं आणि महिना 500 रुपये गुंतवून दोन वर्षांनी 14 हजार रुपये किंवा सोन्याचा दागिना असं सांगून पैसे जमा करायला सुरुवात केली. त्याच्या आमिषाला भुलून अनेकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई त्याच्या या योजनेत गुंतवली. मात्र, त्यांना पैसे परत मिळाले नाहीत.

अखेर, नायरच्या विरोधात 20 गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नायर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आणखी फिर्यादी उघडपणे समोर येऊन तक्रार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या