नेहरु घराण्यामुळेच बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद फोफावला; साध्वी प्राची यांचे वादग्रस्त वक्तव्य

1087

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नहेमी चर्चेत असणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बलात्कार, दहशतवाद आणि नक्षलवाद ही नेहरु घराण्याने देशाला दिलेली देणगी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. मेरठमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मेरठमध्ये एका कार्यक्रमात साध्वी प्राची यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. नेहरू घराण्यामुळे देशात बलात्कार, दहशतवाद आणि नक्षलवाद फोफावल्याचे त्या म्हणाल्या. देशात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर प्रतिक्रिया देताना देशाची ओळख ‘रेप कॅपिटल’ अशी होत असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना साध्वी प्राची यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव सत्तेवर असताना बलात्काऱ्यांना संरक्षण देत होते. आता विरोधी पक्षात असताना ते या विरोधात धरणे आंदोलन करत असल्याचे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमातच साध्वी प्राची यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले आहे. हैदराबादमधील डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्येतील आरोपींचे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांचा आदर्श समोर ठेवत उन्नाव प्रकरणातही अशीच कारवाई करावी, असेही त्या म्हणाल्या. उन्नाव प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली. या कार्यक्रमातील साध्वी प्राची यांच्या वादग्रस्त वकक्तव्यांमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या