बलात्कार करणाऱ्यासोबत पीडित तरुणी राहते म्हणजे दोघांचे संबंध सहमतीचेच ! दिंडोशी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बलात्काराचा आरोप करणारी तरुणी जर तिच्यावरील कथित अत्याचाराची वेळीच तक्रार दाखल न करता घटनेनंतरही आरोपीसोबत राहत असेल तर त्या दोघांमधील संबंध सहमतीचेच मानले जाऊ शकतात. अशा प्रकरणात आरोपीने दिलेले लग्नाचे वचन खोटे मानू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत दिंडोशी सत्र न्यायालयाने ठाण्यातील आरोपी तरुणाची जामिनावर सुटका केली. आरोपी श्रीकांत खंदारे मागील वर्षभरापासून ठाण्याच्या मध्यवर्ती तुरुंगात कैद होता.

एफआयआरनुसार आरोपी तरुण व पीडित तरुणी या दोघांचे जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत प्रेमसंबंध सुरू होते. यादरम्यान बळजबरीने बलात्कार करण्यात आला. त्यानंतर डिसेंबर 2019 पासून दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये नवी मुंबईत राहत होते. पुढे दोघे नायगाव येथे एकत्र राहू लागले. कोरोना लॉकडाऊनमध्ये आरोपीने पीडित तरुणीकडे दुर्लक्ष केले, तो तिला टाळू लागला. तसेच लग्नाबाबत विचारणा करताच त्याने धमकावले, असा आरोप पीडित तरुणीने केला होता.

पीडितेच्या या सर्व आरोपांचे आरोपी तरुणातर्फे खंडन करण्यात आले. या प्रकरणात आरोपी श्रीकांत खंदारे याला नाहक गोवण्यात आले आहे. दोघांनी परस्परसहमतीने संबंध ठेवले होते. आरोपी श्रीकांत खंदारेने धर्मांतर करण्यास नकार दिला म्हणून पीडितेने त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली होती, असा युक्तिवाद अॅड. गणेश चव्हाण यांनी केला. यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. आर. एस. कनोजिया यांनी बाजू मांडली. खटल्यात आरोपीची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी ‘दर्द से हमदर्द तक’ या संस्थेने निःशुल्क सेवा पुरविली.

आरोपी व पीडित तरुणी दोघेही सज्ञान असून लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध करणारा कुठलाही पुरावा सरकारी पक्षाने सादर केलेला नाही. त्यामुळे भादंवि कलम 376(ब) अन्वये गुन्हा लागू होऊ शकत नाही, असा दावा बचाव पक्षाने केला. त्यानंतर एफआयआर आणि साक्षीदारांचे जबाब विचारात घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांनी आरोपी श्रीकांत खंदारेला 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश दिले.