ऐ मालिका तेरे ‘बळी’ हम!

172

<< टिवल्या-बावल्या >>   शिरीष कणेकर 

मराठी मालिकांचा प्राण काय असतो? सॉरी, काय असतो नाही, काय असायला हवा? आधी कथा आणि मग पटकथा, मुळात कथेत दम हवा व त्यावर विणलेल्या पटकथेत कौशल्यपूर्ण प्रवाही पकड हवी.

बरोबर? पण काही सन्माननीय अपवाद वगळता या दोन आघाड्यांवरच मालिका सडकून मार खाताना आढळतात. कथेचा जीव लहान असतो व पटकथा म्हणजे निव्वळ फापटपसारा असतो. मालिकेनं काय सांगायला सुरुवात केली व ती कुठे भरकटत चाललेय हेच कळत नाही. हे असं सर्रास का होतं? सुरुवातीला बरी वाटणारी मालिका कालांतरानं मस्तकात जायला लागते. इतक्या दिवसांच्या सवयीनं (व दुसरा काहीच उद्योग नसल्यानं) माणसं आपली कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे बघत राहतात. कंटाळादेखील त्यांच्या अंगवळणी पडतो. मालिका बघायची, बघून वैतागायचं आणि वैतागून मालिकेच्या विरुद्ध जिभेचे आसुड ओढायचे. दोन मालिकाप्रेमी भेटले की मालिकेला मध्ये घेऊन तिचं शवविच्छेदन करतात व मालिकेची वेळ झाली की घरी धावतात. आजीबाईदेखील गवार आणि शेंगा मोडत मालिकेच्या नावानं बोटं मोडतात.

हे असं मालिकेमागून मालिकेत नियमितपणे का होत असतं? मालिका सुरू झाली की ‘बरी आहे – बरी आहे’? अशी हवा पसरते. ही हवा विरायला वेळ लागत नाही. पुढे पुढे तर मालिका मस्तकात जायला लागते. असं का? माझ्या मते याला निर्माते, दिग्दर्शक व सर्वात जास्त म्हणजे वाहिनी जबाबदार आहे. ते ही वेळ प्रेक्षकांवर आणतात.

मालिकेचे भवितव्य अंधारात असल्यानं व प्रेक्षकांचा प्रतिसाद आधी कळू शकत नसल्यानं ‘प्लॅनिंग स्टेज’ला मालिका आटोपशीर असते. ती लेखक व दिग्दर्शक यांच्या कह्यात असते. साहजिकच ती दर्शकांना बरी वाटते. ते एकमेकांना हे सांगतात. दर्शक वाढतात. मुख्य म्हणजे मालिकेचा टी.आर.पी. वाढतो. बस्स हेच तर हवं होतं. याचसाठी केला होता अट्टहास. आता जोरात चाललेली मालिका कोण बंद करेल? आपल्याच पायावर कुऱ्हाड कोण मारून घेईल? चलने दो. घाला पाणी, पाळणा लांबवतात तशी मालिका लांबवा. स्वतःला लेखक म्हणवता ना, मग लिहा पुढचे भाग. दिग्दर्शक आहात ना, मग रंगवा पुढचे भाग. मग ‘होणार सून मी या घरची’मध्ये अर्थाअर्थी संबंध नसलेले भाग घुसवलेले आपण पाहिलेच होते की काय चाललंय तेच कळत नाही. अहो, काय चाललंय काय, मालिका रेटून पैसे कमावण्याची लाइन आहे.

मी आतल्या गोटातील माणसांकडून ऐकलं की या सर्व प्रकारात वाहिन्या या प्रमुख खलनायक आहेत. मालिकेत काय व कसं जायला हवं हेदेखील तेच ठरवितात. एवढी जर तुम्हाला अक्कल आहे तर तुमच्याच सर्वज्ञ माणसांनीच मुळात मालिका लिहून दिग्दर्शित का नाही केली? पण हे त्यांना तोंडावर विचारण्याची कोणाची टाप लागून गेल्येय? सगळय़ा चाव्या त्यांच्या हातात असतात. ‘क्रिएटिव्ह’ माणसांना हे पदरी बाळगतात. अन् तेच शिव्याशापांचे धनी होतात. माझा एक मित्र एका विनोदी मालिकेत काम करतोय. आकस्मात वाहिनीकडून आदेश आलाय की यापुढे मालिका कौटुंबिक, जिव्हाळ्याची व रडवेली करायची. माझा मित्र व मालिकेतील इतर कलाकार रडवेले झालेत. वाहिनीचं काय, ते ‘ऑर्डर’ देऊन मोकळे झालेत. निभावून न्यायचंय या मंडळींना. लोकांसमोर जायचंय यांना, शिव्याशापाचं धनी व्हायचंय यांना. सगळं करून सावरून वाहिनी नामानिराळी. त्यांना मालिकेची ‘क्रिएटिव्ह’ बाजू कळत नसते, पण व्यवहाराची बाजू अचूक कळते. (असे त्यांना वाटते) ‘क्रिएटिव्हिटी’ चुलीत घालून व्यवहार कसा साधता येतो हे त्यांनी एकदा सांगावंच, पण ही अदृश्य शक्ती आहे. ती टी.व्ही.वर दिसत नाही. तरी पण मालिकांतून सतत जाणवत व खटकत राहते. तुम्ही-आम्ही त्या खेळखंडोबाचे मूक व हतबल साक्षीदार असतो.

थँक्स टू वाहिनी, लेखक, दिग्दर्शक व निर्माते. यांच्या कृपेनं मालिकेतील पात्रे सरडय़ाप्रमाणे रंग बदलताना आपण उघडय़ा डोळ्यांनी पाहतो. पात्रांच्या आमूलाग्र स्वभाव बदलाचं कुठलंही तर्कशुद्ध स्पष्टीकरण द्यायला ही मंडळी बांधील नसतात. मालिकाभर दुष्टाव्याचा व खल कारवायांचा डोंगर उभारणारी जान्हवीची सावत्र आई (आठवा – ‘होणार सून मी…’) रातोरात श्यामची आई होते. जावयाला जावईच न मानणारा घमेंडखोर दाभोळकर (आठवा – ‘का रे दुरावा?’) एका एपिसोडमध्ये तुकाराम माऊली होतो. ‘पसंत आहे मुलगी’मधली घरादाराला डसणारी विषारी इंगळी एकाएकी ‘नॉर्मल’ होते. आता ‘काहे दिया परदेस’मधल्या तोंडाळ ‘अम्मी’ची माणसाळण्याची पाळी आहे.

या मालिकांचा एक ‘कॉमन’ धर्म आढळतो. त्यातल्या वाईटात वाईट माणसाचंही शेवटी वाईट होत नाही. त्यांना उपरती होते किंवा सरळ सरळ त्यांचा जादुई कायापालट होतो. हे कसं काय हा प्रश्न टी.व्ही.च्या ‘स्क्रीन’ला विचारावा तर मालिकाच तिथून गायब झालेली असते. रात गयी बात गयी. कालांतरानं या टुकार मालिकांचा उल्लेख गाजलेली मालिका असा करायचा असतो. (सगळेच मराठी चित्रपट अलीकडे गाजलेले असतात त्याप्रमाणे). ‘खुलता कळी खुलेना’मधली गरळ ओकणारी मोनिका पुढेमागे मदर तेरेसासारखी झालेली दाखवली तर निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही. तान्ह्या मुलीला सोडून मोनिका खुशाल सासरी निघून येते आणि तिची करारी सासू तिला म्हणते, ‘‘रहा गं रहा. आता इथेच रहा.’’ मग त्या नवजात अर्भकाला कोणी सांभाळायचं? मानसीनं, आजी-आजोबांनी, विक्रमनं की मी?…

फर्मास अभिनय व चटपटीत संवाद यांच्या बळावर या सुमार मालिका तरून जातात. आपल्या कलाकारांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांच्या पुढ्यात टाकलेला प्रसंग ते निमूटपणे निभावून नेतात., नो क्वश्चन आस्कड्! लेखनातील दोष व त्रुटी, संवाद-लेखक भरून काढतात. या संवादांच्या लाटेवर दर्शक तरंगत राहतात. कलाकारांना व संवाद-लेखकांना प्रत्येक वेळी श्रेय मिळतंच असं नाही. सर्व उणिवावर पांघरूण घालण्याचं काम ते इमानेइतबारे करीत असतात. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ हे प्राजक्ता माळीचं वैयक्तिक निमंत्रण मानून मी ती मालिका आवर्जून बघतो. मला एक कळत नाही की मोडलेल्या कुठल्याच लग्नाचं तिला अगदीच सोयरसूतक कसं नसतं? तिची गुंतवणूक लग्नकार्य, कपडे, हत्तीवरून वरात, रुखवत यात असते, दस्तुरखुद्द नवरा-मुलगा ‘इंमटेरिअल’. तो कोणी असेना. नाव कळलं की उखाणा तयार.

हे असं काय गं प्राजू?…

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या