डॉ. किशोर सानप

> महेश उपदेव

महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातील विदर्भाचे सिद्धहस्त लेखक व प्रसिद्ध समीक्षक, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किशोर सानप यांच्या निधनाने आपण एका अभ्यासू समीक्षकाला मुकलो आहोत. डॉ. किशोर सानप यांनी साहित्याची केलेली समर्पक सेवा दखलपात्र ठरली आहे. संतसाहित्य निर्मितीच्या तुलनेत समीक्षकांची संख्या कमी जाणवण्याच्या काळात त्यांची गैरहजेरी विदर्भाला जाणवणार आहे. डॉ. किशोर सानप यांनी मराठी साहित्यामध्ये अनेक मौलिक ग्रंथांची भर घातली. अनेक ग्रंथांचे समीक्षण केले. ते उत्तम लेखक, उत्तम परीक्षक व अभ्यासू वक्ते होते. वाणिज्य शाखेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि एम.फिल. या पदव्या प्राप्त केल्या. बहिःशाल विद्यार्थी म्हणून त्यांनी मराठी साहित्य विषयातही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. एवढेच नाही तर ‘भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ हा विषय घेऊन त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथून आचार्य पदवी प्राप्त केली. आधुनिक लेखक, कवी ते संतकवी अशा व्यापक परिप्रेक्षात त्यांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. गोंदिया येथे 2012 ला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच गुरुपुंज, मोझरी येथे 2023 मध्ये झालेल्या 10व्या शेतकरी साहित्य संमेलनाचेसुद्धा ते अध्यक्ष होते. डॉ. सानप यांनी वर्धा येथील गो. से. वाणिज्य महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. ते विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी होते. डॉ. किशोर सानप यांचा जन्म 7 जानेवारी 1956 रोजी अकोला येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची होती. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अकोला येथे झाले. आईचे वडील हे कीर्तनकार होते, त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव किशोर यांच्यावर बालवयात पडला. कालसापेक्ष नावीन्यता, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा व शैलीचा शोध घेणे या सूत्रांच्या आधारे डॉ. सानप यांनी मराठी साहित्यातील कादंबरीची आणि काव्याचीही समीक्षा केली.

भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांच्या समग्र साहित्याची साक्षेपी समीक्षा करून एका लेखकाच्या साहित्यातील त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, जीवनमूल्यांचा आणि लेखकाच्या शैलीच्या अंगाने शोध घेणाऱया समीक्षा पद्धतीचा वस्तुपाठ त्यांनी मराठी समीक्षेत निर्माण केला. सानप यांनी सुधाकर गायधनी यांच्या महाकाव्याचीही साक्षेपी चिकित्सा केली. ‘युगान्तराची कविता’ या ग्रंथात त्यांनी समकालीन कवींच्या कवितेची समीक्षा केली आहे. संतसाहित्यामध्ये त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा साकल्याने अभ्यास मांडला आहे. प्रखर सामाजिक भूमिका मांडणाऱया संत तुकारामांच्या अभंगातील सत्यान्वेषी दृष्टिकोन हे डॉ. किशोर सानप यांच्या संशोधनातील मूलभूत तत्त्व आहे. संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातील धर्मचिकित्सा, समाजविज्ञान याआधारे तुकारामांची विज्ञानवादी दृष्टी मांडली आहे. संत तुकारामांच्या उपलब्ध सर्वच संदर्भ साहित्याचे परिशीलन त्यांनी यासाठी केले आहे. संत तुकाराम यांच्या साहित्यासंदर्भात इतर संशोधकांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी त्यांची स्वतंत्र मतेही मांडली. ललित आणि संतसाहित्यादी वैचारिक सकस लेखन करणाऱया समकालिनांमध्ये डॉ. किशोर सानप यांचे नाव ठळक अक्षरांमध्ये नोंदवण्याइतके महत्त्वाचे आहे. ‘समग्र तुकाराम दर्शन’ या ग्रंथामुळे तुकारामांचा अभ्यास या ज्ञानशाखेत मोलाची भर पडली आहे, असे मत प्रख्यात अभ्यासक सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे. साहित्याचा गौरव म्हणून डॉ. किशोर सानप यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, सुदाम सावरकर जनसारस्वत स्मृती पुरस्कार, प्र. न. जोशी संतमित्र ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार, आद्य म्हाईभट पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. संत तुकाराम जीवनगौरव पुरस्कार, गिरीश गांधी फाऊंडेशन समीक्षा पुरस्कार ही त्यांना लाभले होते. डॉ. सानप यांच्या जाण्याने महाराष्ट्र ज्येष्ठ समीक्षकाला मुकला आहे.