‘विदर्भ आत्मबळ यात्रा’: मुख्यमंत्र्यांना विदर्भात आशिष देशमुखांचा घरचा आहेर

14

सामना ऑनलाईन । मुंबई

विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख विदर्भातील ६२ मतदारसंघ पालथे घालणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अर्धा डझन मंत्र्यांचे बालेकिल्ले असलेल्या विदर्भातच भाजपा आमदाराने आत्मबळ यात्रेचा श्रीगणेशा केल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला आहे.

प्रथम टप्प्यात विदर्भातील ११ जिल्ह्यात जनतेची आस्था असलेल्या ११ ठिकाणी भेटी देऊन देशमुख विदर्भाबद्दल जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेत आहेत. शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व बेरोजगार युवकांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी ७ जानेवारी पासून ते १३ फेब्रुवारी पर्यंत ‘विदर्भ आत्मबळ यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ते म्हणाले की, विदर्भाची सद्य परिस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, लोडशेडिंग, कुपोषण,नक्षलवाद, विदर्भाचा सर्वांगीण विकास व इतर प्रश्नांवर त्यानी आवाज उठवला आहे. मागील ६० वर्षात विदर्भातील सिंचनासाठी राखून ठेवलेला पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे वळविण्यात आला.ह्याचाच दु:खद परिणाम म्हणजे कर्जबाजारी झालेल्या ३२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या असा आरोप त्यांनी केला. कापूस, सोयाबीन, संत्र, तांदूळ इत्यादी नगदी पिके असूनसुद्धा शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही. कारण विदर्भात कृषी प्रक्रिया उद्योग नाहीत. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या धान उत्पादक जिल्ह्यात रोवणीच्या वेळी पाणी नसल्यामुळे बरेच ठिकाणी शेती पडीत ठेवण्यात आली आहे.त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे.विदर्भात गुंतवणूक नाही.त्यामुळे बेरोजगार युवक, व्यवसाय, उद्योग, आय.टी. कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्यांना विकासाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांचे स्थलांतरण होत आहे. ही गंभीर परिस्थिती विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिसून येते असेही देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या