१९ वर्षांखालील विदर्भ संघातील खेळाडूंना प्रत्येकी ५ लाखांचे बक्षिस

26

सामना प्रतिनिधी नागपूर

१९ वर्षांखालील विदर्भाच्या ज्युनिअर्स संघाने कुचबिहार करंडक चषकावर नाव कोरले व विदर्भाच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपदाचा बहुमान पटकाविल्याबध्दल संघातील अकरा खेळाडूंना प्रत्येकी ५ लाखांचे तर उर्वरीत खेळाडूंना प्रत्येकी ३ लाखांचे रोख बक्षिस व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.

विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे १९ वर्षांखालील विदर्भ संघातील खेळाडूंचा सत्कार बिलमोरिया सभागृहात आयोजित करण्यात आला होता. विजेतेपद पटकाविणाऱ्या संघातील खेळाडूंना रोख बक्षिस व गौरवचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर विदर्भ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जयस्वाल, उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सचिव बी. एस. भट्टी व १९ वर्षांखालील विदर्भ संघाचे प्रशिक्षक उस्मान गनी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ रणजी संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, सुब्रतो बॅनर्जी, रणजी संघाचा कर्णधार फैज फजल, वसिफ जाफर उपस्थित होते. विदर्भाने पहिला सामना १५ नोव्हेंबर २०१७ ला सलामी सामन्यात हैद्राबादला नमवित विजयी रथ सुरु केला होता. त्यांनतर उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, जम्मु काश्मिर, असोसिएट, त्रिपुरा या संघाला पराभूत करीत बाद फेरीत प्रवेश केला होता. उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक, उपांत्य सामन्यात पंजाबला तर अंतिम सामन्यात मध्यप्रदेशला पराभूत करीत विजेतेपदाचा मानकरी ठरला. याप्रसंगी विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष म्हणाले की, ज्युनिअर विदर्भ संघात जिंकण्याची क्षमता होती. प्रशिक्षकांचा योग्य निर्णय आणि नियोजन व संघातील प्रत्येक खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर विदर्भाने जेतेपद पटकाविले असे मत यावेळी वैद्य यांनी केले. याप्रसंगी विजेतेपद पटकाविणाऱ्या संघाचे प्रशिक्षक उस्मान गनी यांनी अनुभव व्यक्त करताना सांगितले की, जेतेपद मिळविणे सोपे नव्हते, मात्र संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी आपली भुमिका योग्यरित्या सांभाळल्याने विजय मिळाला. व्हीसीए अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जयस्वाल याप्रसंगी म्हणाले की, व्हीसीएकरीता २०१७-१८ हे वर्ष स्वप्नावत सत्र होते. सिनिअर्स आणि ज्युनिअर्संनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे व्हीसीएसाठी हे वर्ष अतिशय आनंददायी झाले, असे मत यावेळी जयस्वाल यांनी केले. ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी नागपूरातील प्रतिभावंत पंच अभिजित देशमुख यांची निवड झाल्याबद्दल याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विदर्भ संघातील सहाय्यक प्रशिक्षक विक्रांत गोन्नाडे, ट्रेनर युवराजसिंग, व्यवस्थापक नईम रज्जाक,फिजिशियन डॉ.खुराणा यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

सांघिक खेळामुळेच जेतेपद मिळविणे शक्य झाले : अथर्व तायडे
या स्पर्धेत सलामी सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत प्रत्येक खेळाडूंनी पूर्ण योगदान देत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे सांघिक खेळामुळेचे संघाला विजेतेपद मिळाले असे मत अंतिम सामन्यात ३२० धावा काढणारा विदर्भ संघाचा कर्णधार अथर्व तायडे यांनी व्यक्त केले.

पुरुष एकल कॅरम स्पर्धा उद्यापासून
उकेश स्मृति उत्साही क्रीडा मंडळाच्या वतीने मुकेश गायधने स्मृति पुरुष एकल कॅरम स्पर्धा ३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना प्रथम पुरस्कार ५ हजार रोख देण्यात येणार आहे. द्वितीय व तृतिय पुरस्कार अनुक्रमे ३ हजार व दीड हजार देण्यात येणार आहे. स्पर्धेचा समारोप ८ फेब्रुवारीला होणार आहे. स्पर्धेत शहरातील कॅरमपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या