विदर्भ ही तोंडाच्या कर्करोगाची राजधानी, सरकार उपचारांसाठी धोरण तयार करणार

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तोंडाच्या मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन जीवघेणे आहे. त्यामुळेच विदर्भ ही तोंडाच्या कॅन्सरची राजधानी बनली आहे. या आजारावर नियंत्रणासह रुग्णांवर उपचारासाठी शासन लवकरच धोरण तयार करील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील ‘पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस पुनर्वसन प्रकल्प, 3 डी प्रिंटिंग युनिट, काँप्रिहेन्सीव्ह डेंटिस्ट्र’ या तीन विभागांचे लोकार्पण झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. तोंडाच्या कर्करोगावरील रुग्णांवर वेळीच उपचारासह या आजारावर नियंत्रणासाठी शासन सर्वसमावेशक धोरण आखून त्यासाठी निधीही दिला जाईल, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर म्युकरमायकोसिस हा वेदनादायी आणि जीवघेणा आजार बळावला. दंत महाविद्यालयाने डिजिटलायझेशनची कास धरली असून येथील 3 डी प्रिंटिंग युनिटमुळे रुग्णांसाठी अचूक आकाराचे इम्प्लांट तयार करता येईल. त्यामुळे नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय या तंत्रज्ञानाने युक्त देशातील पहिले शासकीय रुग्णालय झाल्याचे गौरवोद्गारही देवेंद्र फडणवीस यांनी काढले.