Video – चालत्या स्कूटरवर केली आंघोळ, पोलिसांनी कापलं इतकं चलान

1225

सध्या इंटरनेटमुळे व्हायरल होणं हा प्रकार काही नवीन राहिलेला नाही. प्रसिद्ध व्हायची इच्छा असलेले अनेक जण अनेक भन्नाट क्लृप्त्या वापरून व्हायरल व्हायचा प्रयत्न करतात. कधी कधी हा प्रयत्न फसूही शकतो. असंच काहीसं दोन स्कूटरस्वारांबाबत घडलं आहे.

ही घटना व्हिएतनामच्या दक्षिण भागात घडली आहे. फेसबुकवर जियो थाँग नावाच्या एका प्रोफाईलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात एका चालत्या स्कूटरवर हाफ पँट घालून दोन जण स्वार झाल्याचं दिसत आहे. या दोघांच्या मध्ये पाण्याने भरलेली एक बादली ठेवली आहे. पाठी बसलेला माणूस स्वतःवर आणि स्कूटर चालकावर पाणी ओततो. मग दोघे साबण लावून चांगला फेसही काढतात. फेस अंगाला चोपडून पाणी ओततात, असं या व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खूप प्रसिद्धी मिळेल अशी या दोघांची अपेक्षा होती. मात्र झालं भलतंच. नेटकऱ्यांनी कडक शब्दांत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. हा व्हिडीओ व्हिएतनाम पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यांनी व्हिडीओतून स्कूटरचा नंबर टिपला आणि या दोन ‘आंघोळ’स्वारांना गाठलं. वाहतूक नियम मोडणे, इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात टाकणे, हेल्मेट न घालणे अशा विविध कारणांवरून या दोघांकडून तब्बल 80 डॉलर म्हणजे 6 हजार रुपये इतकं चलान कापण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या