चंद्रपूर महानगर पालिकेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आमसभा

कोरोना साथरोग संकटाला संपूर्ण देश आणि राज्यासह चंद्रपूर मनपाही ताकदीने तोंड देत आहे. या काळातील आमसभा मनपा सभागृहात भरविणे शक्य नसल्याने पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सवर चंद्रपूर मनपाची आमसभा घेण्यात आली. आमसभेत विरोधकांनी लॉकडाऊन काळातील कळीच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. वादग्रस्त मुद्द्यांवर महापौरांनी वेळ मारून नेली तर आयुक्त मात्र मौन राहिले.

कोरोना साथरोग संकटात 5 लाख लोकसंख्येच्या चंद्रपूर शहरात शहर मनपाने उत्तम कामगिरी केली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची आखणी व त्या क्षेत्रातील तपासणीसह कोरोना नियंत्रणात महापालिकेचा मोठा सहभाग राहिला आहे. याच काळात मनपा आमसभा संसर्ग टाळण्यासाठी आयोजित झाल्या नाहीत. आज पहिल्यांदा चंद्रपूर मनपाची आमसभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. महापौर- पदाधिकारी व गटनेते यांनी सभागृहात बसून सभेत सहभाग नोंदवला तर अन्य नगरसेवकांनी घरून अथवा कार्यालयात बसून यात सहभाग घेतला.

मनपाच्या या आमसभेत विरोधकांनी लॉकडाऊन काळातील 3 वादग्रस्त मुद्द्यांवर सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले. यात संचारबंदीच्या काळात गरिबांसाठीच्या जेवण डब्यातील अपहार प्राधान्याने पुढे आणला गेला. तर दुसरीकडे मास्क खरेदीत घोटाळा झाल्याचे विरोधी नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. याशिवाय मनपाने विलगीकरण कक्षात नेमलेल्या निकृष्ट भोजन देणार्‍या नागपूरकर कंत्राटदाराला सत्ताधारी वाचवत असल्याचा आरोप करण्यात आला. महापौर राखी कंचर्लावार यांनी मात्र आरोपात कुठलेही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया दिली तसेच या गंभीर मुद्द्यांवर मनपा आयुक्तांनी मौन पाळले.

दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या या आमसभेत मनपाच्या ऑपरेटरने विरोधी नगरसेवकांचे माईक महापौरांच्या निर्देशानुसार बंद करून ठेवल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. त्यामुळे ही आमसभा सत्ताधारी पक्षाने रेटून नेली असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या