हंडाभर पाण्यासाठी महिला आपसात भिडल्या, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

लसामना ऑनलाईन । भिवंडी

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषत: भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी आता भांडण-तंटे, मारामारी देखील होताना पाहायला मिळत आहे. भिवंडीतील एका गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची चक्क हाणामारी झाली आहे. पाण्यासाठी महिला आपसात भिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

भिवंडी तालुक्यातील मैदे गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र जागावे लागत आहे. गावातील विहिरी आणि बोरिंगचे पाणी आटल्यामुळे गावात फक्त एकच पाणवठा शिल्लक राहिला आहे.  या ठिकाणी दिवसातून केवळ 8 ते 10 हंडे पाणीच उपलब्ध होत असल्याने गावातील महिला रात्रीपासूनच रांग लावून असतात. येथील एका महिलेला पाणी न मिळाल्याने रांग तोडून पाणी भरण्याचा प्रयत्न केल्यामुळे महिलांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, पाण्यासाठी एकमेकींच्या झिंज्या ओढणाऱ्या या महिलांच्या भांडणाचे एका नागरिकाने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रण केले असून सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ठाणे जिल्ह्यात अनेक धरणे असून त्यामधून मुंबई- ठाण्याला पाणीपुरवठा होत असतो. मात्र धरणांच्या आसपासच्या गावांना मात्र पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.