Video यवतमाळ – पूरपरिस्थितीमुळे शेतकरी त्रस्त, भाजप आमदार गौतमी पाटीलसोबत नाचण्यात व्यस्त

संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तसेच उमरखेड तालुक्यात पावसामुळे भयावह पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाततोंडाशी आलेले शेत वाहून गेले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी पावसामुळे त्रस्त असताना आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे हे मात्र एका कार्यक्रमात थेट स्टेजवर डान्सर गौतमी पाटीलसोबत डान्स करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्ह्यात त्यांच्याव विरोधात संतापाची लाट पसरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये भाजप आमदार नामदेव ससाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती. या महोत्सवात नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतल्याने या कार्यक्रमास नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी गौतमीसोबत स्टेजवर ठेका धरला. आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी अशा प्रकारे डान्स करून असंवेदशीलतेचे प्रगटीकरण केले, अशी टीका त्यांच्यावर सध्या होत आहे.

जिल्ह्यात यावर्षी ओला दुष्काळ सदृश स्थिती आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावात अद्यापही पूर परिस्थिती आहे. एकीकडे बळीराजा रक्ताचे अश्रू ढाळतोय. तशातच सत्ताधारी भाजप पक्ष गौतमी पाटील हिच्या सोबत ठेका धरून नाचत असल्याने त्याच्या तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहे