
फॉरेस्ट ऑफिसर परवीन कासवान यांच्या वन्यजीवांबद्दलच्या पोस्ट नेहमीच नेटिजन्सचे लक्ष वेधून घेतात. नुकताच त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. पश्चिम बंगालमधील जलदापारा राष्ट्रीय उद्यानात ड्रोनद्वारे काढलेल्या 40 हून अधिक हत्तींच्या कळपाचा हा आकर्षक व्हिडीओ आहे. तो वन्यजीवप्रेमींना फारच आवडला आहे. या दृश्याचे वर्णन करताना ‘आपल्या राष्ट्रीय उद्यानात तब्बल 40 हत्तींचा एक भव्य कळप दिसला. त्यात लहान खेळकर पिल्लेही आहेत. यावरून हत्ती निरोगी आहेत आणि त्यांची संख्या चांगली वाढतेय हे समजते आहे. हे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपले आहे,’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. त्यावर नेटिजन्सनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘वाह…हे आश्चर्यकारक आहे. विश्वास बसत नाहीये की, हे आपल्या देशात आहे,’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
























































