Video- तान्हाजीमधलं मराठमोळ्या ढंगातलं ‘माय भवानी’ गाणं पाहिलंत का?

1322

हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातलं माय भवानी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्कंठा ताणली गेली होती. चित्रपटाचा ट्रेलरही तुफान हिट झाला होता. आता मराठमोळ्या ढंगातलं हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

या गाण्यात तान्हाजी मालुसरेंचा मुलगा रायबा याच्या लग्नाची तयारी होत असल्याचं दिसत आहे. होळीच्या सणाचं निमित्त साधून हे आमंत्रण दिलं जात असल्याचं चित्रण गाण्यात आहे. या गाण्यात होळीतली एक परंपरा असलेली पालखी नाचवणं ही प्रथाही पाहायला मिळत आहे. गीताचे बोल प्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे यांचे आहेत. या गाण्याला सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांचे स्वर लाभले असून अजय अतुल यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल झळकणार आहे. या खेरीज शरद केळकर, पद्मावती राव, सैफ अली खान, अजिंक्य देव, देवदत्त नागे हे कलाकारही यात विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा गाण्याचा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या