राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारप्रमाणेच महाराष्ट्राची वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेने होत आहे का?, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच या घटनेची जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.
आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत. मात्र आज मुंबईत असे गुंड आणि गुन्हेगार येऊन सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करत आहेत. एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला गोळ्या घालून ठार मारले जाऊ शकते, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न मुंबईत निर्माण झाला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुंबई पुन्हा गुन्हेगारीचे केंद्र बनतेय का? महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेने वाटचाल करत आहे का? असे सवाल करत वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी घटना वाढत आहेत. गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारावी असेही वडेट्टीवार पुढे म्हणाले.