विद्या बालनची बहीण करणार अजय देवगणसोबत काम

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या तुफानी यशानंतर आता अजय देवगण फुटबॉलचं ‘मैदान’ काबीज करणार आहे. बातमी वाचून गोंधळू नका. कारण, हा त्याचा आगामी चित्रपट आहे. ‘मैदान’ असं नाव असलेल्या या चित्रपटात अजय एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन हिची बहीणही झळकणार आहे.

बोन कपूर यांची निर्मिती असलेला ‘मैदान’ हा चित्रपट हिंदुस्थानमध्ये फुटबॉलची रुजुवात करणारे प्रशिक्षक अब्दुल सय्यद यांचा बायोपिक असणार आहे. अब्दुल सय्यद हे 1950पासून ते 1963पर्यंत हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. जानेवारीच्या अखेरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

priyamani-actress

या चित्रपटात यापूर्वी अभिनेत्री कीर्ती सुरेश झळकत असल्याची चर्चा होती. मात्र, आता तिच्या ऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी हिची वर्णी लागली आहे. 50हून अधिक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रियमणी झळकली आहे. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती असलेली प्रियमणी ही अभिनेत्री विद्या बालन हिची चुलत बहीण आहे. मैदान खेरीज ती जयललिता यांचा बायोपिक असलेला कंगना रणौत अभिनित थलैवी या चित्रपटात शशिकला ही भूमिका साकारत आहे.

‘मैदान’ची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणव जॉय सेनगुप्ता यांनी केली असून ‘बधाई हो बधाई’ फेम दिग्दर्शक अमित शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या