‘पहरेदार पिया की’ मालिकेवर बंदी आणण्याची मागणी

31

सामना ऑनलाईन । मुंबई

सोनी वाहिनीवरील ‘पहरेदार पिया की’ ही मालिका सुरू होण्याआधीच तिच्या कथेमुळे वादात सापडली आहे. मालिकेत १८ वर्षांच्या तरुणीचे लग्न ९ वर्षांच्या मुलाशी होते. लग्नानंतर परिस्थितीमुळे त्यांच्यात निर्माण होणारे नाते आणि त्या निमित्ताने घडणारे प्रसंग हाच मालिकेचा आधार आहे. अनेकांनी या कथेला विरोध केला आहे.

बालविवाहाला बंदी असताना मालिका अप्रत्यक्षपणे बालविवाहाला प्रोत्साहन देत आहे, असा आक्षेप मालिकेला विरोध करणाऱ्यांनी घेतला आहे. मालिकेच्या विरोधकांनी change.in या वेबसाइटच्या माध्यमातून माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. मानसी जैन यांनी मालिकेविरोधात केलेल्या तक्रारीला १८ पेक्षा जास्त लोकांनी पाठिंबा दिला आहे.

सोनी वाहिनीवरुन मालिकेचे रात्री ८.३० वाजता प्राइम टाइममध्ये प्रक्षेपण केले जाते. मात्र बालविवाहाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणाऱ्या मालिकेवर बंदी आणावी अशी मागणी तक्रारदार मानसी जैन आणि तिच्या समर्थकांनी केली आहे. मालिकेमध्ये ‘नऊ वर्षांचा मुलगा त्याच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या मुलीशी लग्न करतो, तिच्या भांगात कुंकू भरतो’ असे दाखवण्यात आले आहे. या दृश्याला मालिकेच्या विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या