मुंबईचा सलग दुसरा विजय, विजय हजारे ट्रॉफी

45

सामना ऑनलाईन, चेन्नई – सलामीवीर अखिल हेरवाडकर, स्टार खेळाडू श्रेयस अय्यर व कर्णधार आदित्य तरेची दमदार फलंदाजी आणि शार्दुल ठाकूरसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर बलाढ्य मुंबईच्या क्रिकेट संघाने येथे सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमधील लढतीत राजस्थानवर पाच गडी व ५३ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला हे विशेष.

राजस्थानकडून मिळालेल्या १८२ धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईने पाच गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. अखिल हेरवाडकरने सहा चौकारांनिशी ५० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. श्रेयस अय्यरने ४१ धावा केल्या. कर्णधार आदित्य तरेने नाबाद ३६ धावा करीत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने महिपाल रोमरोरच्या ४९ धावांच्या जोरावर १८१ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने ३७ धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शिवम मल्होत्रा व शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अभिषेक नायर व श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उभय संघांमध्ये प्रत्येकी ३८ षटकांचा खेळ झाला.

महाराष्ट्राकडून केरळचा धुवा

मुंबईप्रमाणे महाराष्ट्रानेही विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली. महाराष्ट्राने केरळचा १२२ धावांनी धुवा उडवला आणि चार गुणांची कमाई केली. रुतुराज गायकवाड ७९, कर्णधार केदार जाधव ७१आणि नौशाद शेखने ५७ धावा तडकावल्यामुळे महाराष्ट्राला ३११ धावा उभारता आल्या. ३१२ धावांचा पाठलाग करणाऱ्या केरळचा डाव ३९.५ षटकांत १८९ धावांमध्येच गडगडला. प्रदीप दाधेने ३३ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. एस काझीने तीन फलंदाज बाद केले.

धोनीचे शतक, झारखंडचा विजय

विराट कोहलीच्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने विजय हजारे ट्रॉफीत १२९ धावांची अफलातून खेळी साकारत झारखंडला छत्तीसगढविरुद्ध ७८ धावांनी दमदार विजय मिळवून दिला. वरुण ऍरोनने गोलंदाजीत तर शाहबाज नदीमने अष्टपैलू चमक दाखवली.

आपली प्रतिक्रिया द्या